पुणे

Fraud Case : हिंजवडी पोलिसांकडून 48 बनावट व्हिसा जप्त !

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवणारी टोळीच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बनावट व्हिसा बनवणार्‍या तिघांसह शिक्का बनवून देणार्‍यासदेखील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने तब्बल 125 लोकांकडून पासपोर्ट घेऊन त्यांना व्हिसा बनवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच, 48 बनावट व्हिसाही जप्त करण्यात आले आहेत.

विजय प्रताप सिंग (44, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), किसन देव पांडे (35, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (38, रा. किवळे, पुणे. मूळ रा. गवळेनगर, धुळे), किरण अर्जुन राउत (34, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी आयात-निर्यात व्यवसायात काम करत होते. तेथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. हेमंत पाटील याने यापूर्वी नोकरीच्या आमिषाने लोकांना फसवण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या विजय आणि किसन या साथीदारांसोबत मिळून लोकांच्या फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला.

भारतातून वेल्डर, वाहनचालक, प्लंबर असे काम करणारे कामगार एक ते दोन वर्षांसाठी विदेशात जातात. तिथे काम करून एकरकमी पैसे घेऊन भारतात येतात. त्यांना व्हिसा देण्यासाठी एजंट कंपनी सुरू करून त्याद्वारे लोकांकडून व्हिसा काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यानुसार, मागील चार महिन्यांपासून आरोपींनी ब्लू ओशन मरीन कंपनी या नावाने कंपनी सुरू केली. व्हिसा काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पासपोर्ट घेतले जात. विश्वास संपादन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात. कागदपत्रे आल्यानंतर पासपोर्टवर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना खरे व्हिसा असल्याचे भासवून दिले जात.

ब्रुनेई देशात वेल्डर, वाहनचालक, प्लंबर या कामांसाठी कामगार पाहिजे असल्याचे सांगून नागरिकांना लुटण्याचा डाव आरोपींनी आखला होता. काहीजण ब्रुनेई देशात जाण्यासाठी व्हिसा घेऊन विमानतळावर गेले असता तिथे हे शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही लोकांनी दिल्ली येथील ब्रुनेई देशाच्या दुतावासात जाऊन खातरजमा केली. त्या वेळी त्यांच्या पासपोर्टवर बनावट शिक्के मारले असल्याची खात्री झाली. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली. मनीष स्वामी (31, रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी हिंजवडी पोलिसांनी कस्तुरी चौकाजवळ असलेल्या आरोपींच्या कार्यालयात छापा मारूला असता तिथे तीन आरोपी मिळून आले.

त्यांच्याकडून ब्रुनेई देशात वेल्डर, वाहन चालक, प्लंबर इत्यासाठी कामगार हवे असल्याच्या बनावट वर्क ऑर्डर, 67 पासपोर्ट, दोन लॅपटॉप, संगणक, सात मोबाईल फोन, बनावट शिक्के असा एकूण एक लाख 68 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यातील 48 पासपोर्टवर एका देशाचे व्हिसाचे खोटे शिक्के मारले आहेत. हिंजवडी पोलिसांनी वेळीच आवळल्या मुसक्या पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी हे सात दिवसांत कार्यालय बंद करून पळून जाणार असल्याची माहिती समोर आली. वेळीच हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

या बसा शिक्के घेऊनच जा…

विजय, किसन आणि हेमंत या तिघांनी चिखली येथील युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स या दुकानातून बनावट शिक्के तयार करून घेतले होते. पोलिसांनी दुकानदार किरण राऊत यालादेखील अटक केली. त्याने दुकानावर 'या बसा शिक्के घेऊनच जा' अशा प्रकारची जाहिरात केली होती. पैशांच्या लालसेपोटी किरण याने हे बनावट शिक्के तयार करून दिले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मामुर्डीतून 58 पासपोर्ट जप्त…

आरोपी विजयप्रताप याने मामुर्डी येथील एका लाँड्री चालवणार्‍या व्यक्तीकडे महत्त्वाची कागदपत्रे म्हणून 58 पासपोर्ट ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी त्या लाँड्री चालवणार्‍या व्यक्तीकडे चौकशी करत तिथून 58 पासपोर्ट जप्त केले. या कारवाईमध्ये एकूण 125 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT