पुणे: केंद्र सरकारद्वारे अनुदानित रासायनिक खत विक्रीसाठीचा "फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल" हा पथदर्शी प्रकल्प दिनांक ५ जुन २०२६ पासून प्रायोगिक तत्वावर (पायलट प्रोजेक्ट) राज्यातील कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये राबवण्याचे नियोजित आहे. सध्या फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे मोबाईल बेस अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून याद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या खतांचे बुकींग करता येणार असल्याची माहिती राज्याचे कृषि आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
शेतकऱ्यांना आपल्या फार्मर आयडीचा वापर करून खात्रीलायकरित्या खत मिळवण्याचा मार्ग या कार्यपद्धतीनुसार उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर खतांचे वितरण करण्यामध्ये व सनियंत्रण करण्यामध्ये प्रशासनालादेखील सुविधा निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांना विक्रेत्याकडे खत उपलब्ध आहे किंवा नाही हे प्रत्यक्ष जावून पाहिल्याखेरीज समजत नसल्याने नाहक त्रास होत असल्याचे दिसून येते. या नव्या प्रणालीमुळे ही गोष्ट टाळता येणार आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून आपल्या जवळच्या खत विक्री केंद्रावरील खत उपलब्धता समजणार असून त्यानुसार खतांचे बुकींग करता येणार आहे.
खतांचे बुकिंग अॅपद्वारे होत असल्याने शेतकऱ्यांना विक्रेत्याकडे जावून रांगेत उभे राहावे लागणार नाही. आवश्यक खताचे बुकिंग केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती विक्रेत्याकडून होणार नाही. खताचा अकृषक वापर तसेच इतर गैरवापरास आळा बसेल. शेतकऱ्यांना खत बुकिंग केल्यादिवशी खत मिळणार नसून दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी त्यांच्या सोयीनुसार खत विक्रेत्याकडे क्यू आर कोडसह जाऊन खत खरेदी करू शकतात. कोणताही शेतकरी खतांपासून वंचित राहणार नाही. खते वेळेवर उपलब्ध होतील. खत वितरण प्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक, सोपे व वाजवी होणार आहे.
पॉस मशीन आणि विक्री वेळेबाबत महत्त्वाची सूचना:
केंद्राचा हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी पॉस मशीनमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे दिनांक ४ जून २०२६ रोजी, सायंकाळी पाच वाजलेपासून पॉस मशीन बंद होणार आहेत. दिनांक ५ जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर वगळता, राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्ववत पॉस मशीनद्वारे खत विक्री सुरू होईल.
छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ५ जून रोजी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अॅप लाईव्ह होईल. या दिवशी शेतकऱ्यांना अॅपद्वारे खतांचे बुकिंग करता येईल, परंतु खत खरेदी करता येणार नाही. या दोन जिल्ह्यात बुकिंगप्रमाणे प्रत्यक्ष खत खरेदी दिनांक ६ जून २०२६ पासून करता येईल, याची सर्व शेतकरी व विक्रेत्यांनी नोंद घेण्याचे आवाहन कृषि आयुक्तालयाने केले आहे.