पुणे

अकरावी प्रवेशाची चौथी विशेष फेरी गुरुवारपासून

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या आणि तीन विशेष फेर्‍या राबविण्यात आला. आता चौथी विशेष फेरी सुरू करण्यात येणार असून, त्यात 17 ते 23 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तर 26 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 326 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशांसाठी 99 हजार 979 आणि कोटा प्रवेशाच्या 16 हजार 531, अशा 1 लाख 16 हजार 510 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 1 लाख 1 हजार 355 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेर्‍या आणि तीन विशेष फेर्‍यांमध्ये कोटा आणि केंद्रीभूत प्रवेश फेर्‍याअंतर्गत एकूण 73 हजार 860 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही 42 हजार 650 जागा रिक्त आहेत.

चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 26 ऑगस्टला जाहीर झाल्यावर 31 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत आता चौथ्या विशेष फेरीनंतर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेर्‍या राबविल्या जातील, असेदेखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT