पोहण्यासाठी गेलेल्या 4 शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना Pudhari
पुणे

Pune News: पोहण्यासाठी गेलेल्या 4 शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

मेदनकरवाडी परिसरावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

चाकण: चाकणजवळील मेदनकरवाडी व कडाचीवाडी (ता. खेड) हद्दीलगत असलेल्या पाझर तलावात 13 वर्षांच्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 31) दुपारी उघडकीस आली. पोहताना बुडाल्याने या मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मेदनकरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

ओमकार बाबासाहेब हांगे (वय 13, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. मस्साजोग, ता. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय 13, सध्या रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराच्या मागे, मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय 13, सध्या रा. मेदनकरवाडी, बोरजाईनगर, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाळ मोरे (वय 13, सध्या रा. मेदनकरवाडी, मार्तंडनगर, ता. खेड, मूळ रा. झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी अशी बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावे आहेत. (Latest Pune News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,तलावात बुडालेले चौघेही जण एकाच दुचाकीवरून पी. के. कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या या तलावात पोहण्यासाठी गेले होते. शनिवारी (दि. 31) सकाळपासून ही मुले घरातून बेपत्ता होती. मुले बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांचा तपास लागला नाही.

कडाचीवाडी येथील पाझर तलावाच्या कडेला एक दुचाकी उभी असून काही मुलांचे कपडे तलावाच्या बाजूला पडले असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने तलावात शोध घेत चौघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह तत्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नातेवाईकांच्या आक्रोशाने हा संपूर्ण परिसर हादरून गेला होता. मृत्यू झालेल्या मुलांची कुटुंबे चाकण एमआयडीसीमध्ये नोकरी व भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत असल्याचे समजते.

चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. चाकण पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT