मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. भक्तांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावा, अशी सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी (दि. 26) केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा) तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित कामांबाबत आढावा बैठक पार पडली. या वेळी वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले. (Latest Pune News)
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार बाबाजी काळे, आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, मुख्य वनसंरक्षक विवेक होशीग, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सार्वजनिक कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, श्रुती नाईक, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, उदय गावंदे, माजी सभापती सुभाष मोरमारे, माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, संदीप चपटे, प्रवीण पारधी, अमोल अंकुश आदी उपस्थित होते. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या राजगुरुनगर, तळेघर, भीमाशंकर तसेच बनकर फाटा , जुन्नर, घोडेगाव, तळेघर या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला जात आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि अडचणी गंभीर आहेत. या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे गेले असले, तरी आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. ज्यामुळे रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी पाहता संबंधित विभागांनी तीनही तालुक्यांतील आमदारांसमोर सादरीकरण करून तातडीने अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरातील सर्व अडचणी आणि समस्या तातडीने दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आमदारांनी केली. भीमाशंकरला येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी हे काम लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.