सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा परदेशी विद्यार्थ्यांचा विक्रमी प्रवेश! Pudhari
पुणे

Savitribai Phule Pune University 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा परदेशी विद्यार्थ्यांचा विक्रमी प्रवेश!

69 देशांतील तब्बल 270 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश; चार वर्षांतील सर्वाधिक नोंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षी 69 देशांतील 270 विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड करून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश निश्चित केला आहेत. शिक्षणासाठी भारतातून परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येची चर्चा होते. परंतु, परदेशी विद्यार्थीही भारतातील शिक्षण संस्थांतील, विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.(Latest Pune News)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राद्वारे राबवण्यात येते. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता 2022-23 मध्ये 64 देशांतील 262, 2023-24 मध्ये 64 देशांतील 194, 2024-25 मध्ये 69 देशांतील 210 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर, यंदा 69 देशांतील 270 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील यंदाचे प्रवेश सर्वाधिक ठरले आहेत. त्यात प्रामुख्याने बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, उझबेकिस्तान, आफिकेतील सुदानसारख्या देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) माध्यमातून करण्याचा निर्णय 2015-16मध्ये झाल्यानंतर विद्यार्थीसंख्येत घट झाली. विद्यापीठांना त्यांच्या स्तरावरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुभा दिल्यास या संख्येत वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थी शिक्षणासाठी विद्यापीठात येतात. परदेशी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे.

अफगाणिस्तान, इराण, सीरिया अशा देशांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर संबंधित देशांतील सामाजिक, राजकीय परिस्थितीचाही परिणाम होतो. त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये 2021 मध्ये तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर शिक्षणासाठी अफगाणी विद्यार्थ्यांचे येणे बंद झाले आहे. त्याशिवाय एज्युकेशन फॉर ऑइल ही योजना बंद झाल्याने इराणमधून, त्याशिवाय मध्य आशियाईतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सीरियासारख्या देशांतूनही येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली असल्याचे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT