For 'Valentine', a rose from Mawla went abroad 
पुणे

‘व्हॅलेंटाईन’ साठी मावळातून गुलाब निघाला परदेशात

backup backup

पवननगर : पुढारी वृत्तसेवा : जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे' साठी सज्ज होताना दिसत आहे; परंतु तुम्हांला माहिती आहे का, या तरूणाईच्या हातातल्या बहुतांश गुलाबांना मराठी मातीचा गंध आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जातात. यामुळे लाखो रुपये शेतकर्‍यांच्या हाती पडणार आहेत. असा हा मराठी मातीतील गुलाब परदेशवारीसाठी सज्ज झाला आहे.

संपूर्ण जगभरातील तरूणाईस उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन 'डे' अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतिक असलेल्या गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

या तयारीसाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकर्‍यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने यावर्षी व्हॅलेंटाईन डे ला मावळातून 25 ते 30 लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार असून, स्थानिक बाजारपेठेत 60 ते 70 लाख गुलाबांची निर्यात होणार आहे.

प्रेम भावना व्यक्त करणारा व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला आहे. या दिवशी देश- विदेशातून गुलाबाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर मावळातील फुल उत्पादक शेतकरी हे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून फुलांच्या झाडांची कटींग व बेंडींगला प्रारंभ करून चांगले उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यापासून दिवस-रात्र शेतात राबत आहेत.

20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यातीचा कालावधी असतो. यावर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला 26 जानेवारीला सुरूवात झाली.

यावर्षी पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनाबरोबर दर्जाही उत्तम आहे. पोषक वातावरणामुळे औषधांवर होणारा नाहक होणारा खर्च कमी झाला असून, उत्पादन, दर्जा आणि मागणीमुळे फूल उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकर्‍यांसह फूल उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे.

फुलांच्या दराची प्रतवारी ही लांबीनुसार ठरली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत 40 ते 60 सेंटीमीटरच्या फुलांना मोठी पसंती असते. यावर्षी मावळातील फुलांना चांगली मागणी असून, प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला 14 ते 15 रूपये तर स्थानिक बाजारपेठेत 12 ते 13 रूपये भाव मिळत आहे.

व्हॅलेंटाईन 'डे' ला मावळातील 'डच फ्लॉवर' प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉईजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढ-या रंगाच्या अविलाँस, या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई व इथोपिया या देशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळूर, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकता, भोपाळ, इंदोर, सुरत, हैद्राबाद व गोवा या स्थानिक बाजारपेठेत सर्वाधिक मोठी मागणी असते.

मागील वर्षी कोरोनामुळे फ्लोरीकल्चर इंडस्ट्री पूर्णपणे तोट्यात गेली. लॉकडाऊन व शासनाचे बदलते नियम व अनियमितता यामुळे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात काहीसा दिलासा वाटत असताना पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आली. कोरोना व इंधन दरवाढीमुळे फुल उत्पादनासाठी आवश्यक असणारी खते, औषधे इत्याचींचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात जवळपास 30 ते 35 टक्के वाढ झाली आहे.

विमानप्रवास महागल्याने परदेशी ट्रेडर मंडळींनी भारतीय बाजारपेठेऐवजी केनिया, इथोपिया येथून फुलांची निर्यात केल्याने यावर्षी एक्सपोर्ट मार्केट ठप्प झाले आहे.

मागणीमध्ये घट झाली; मात्र जागतिक बाजारपेठ तुटू द्यायची नसेल तर सर्व शेतकर्‍यांनी तात्पुरता फायदा न पाहता परदेशी बाजारात देखी फुलांची निर्यात करावे असे आवाहन मुकुंद ठाकर यांनी
केले आहे.

बदलत्या हवामानामुळे गुलाब फुलांच्या उत्पादनाचा वाढलेला खर्च त्यातच कोरोनामुळे वाढलेली महागाई व महागलेला विमानप्रवास यामुळे परदेशी बाजारात यावर्षी गुलाब फुलांची मागणी घटली आहे. मात्र भारतीय स्थानिक बाजारपेठेत गुलाब फुलांची मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेत यावर्षी 50 ते 60 लाख तर परदेशी बाजारात 25 ते 30 लाख फुलांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे.
-मुकुंद ठाकर, अध्यक्ष पवना फुल उत्पादक संघ

https://youtu.be/bWbsQMhkdEI

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT