पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या हवेली व वेल्हा तालुक्यांच्या हद्दीवर असणार्या आंबी व कादवे या दोन्ही गावांच्या सीमेवरील डोंगराच्या पृष्ठभागावर प्राचीन कोरलेली काही रेखाटने आढळून आली आहेत. त्यामध्ये कातळ शिल्पाच्या पाऊलखुणा असून, शिवलिंग व ठिपके आढळून आले आहेत. वृत्तपत्र विक्रेता व भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघणे यांनी याचा शोध घेतला आहे. पानशेत धरणाजवळीत तळमाळ डोंगराच्या अवतीभवती अशा प्रकारची कातळ शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पामध्ये रिंग असलेले कप, जोडलेले कप, शेपटी कप, एककेंद्री वर्तुळ, कोन, शिवलिंग, ठिपके तसेच सर्जनद्रिंयाच्या खुणा आढळून आल्या आहेत. या प्रसंगी नवघणे यांच्याबरोबर स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे वेल्हा तालुकाध्यक्ष अक्षय जागडे व मुळशी तालुका उपाध्यक्ष अनिल कडू उपस्थित होते.
अशी कातळ शिल्पे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्रत्येक ठिकाणच्या खडकाची रचना वेगळी असल्याने त्याचप्रकारे आणि शिल्पाची रचना वेगळी असते. अशा कातळ शिल्पांचे जतन अन् संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कोरलेल्या शिल्पांना जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, कायदेशीर बाबी तपासून नवीन कातळ शिल्पे संवर्धन कायद्यांतर्गत ठोस पाठपुरावा सादर करणार आहे.
मंगेश नवघणे, वृत्तपत्र विक्रेता आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य.
रेखाटन 250 व 300 वर्षांपूर्वीचे असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिवलिंग असून, विविध कलाकृती आढळून येत आहेत. काही जणांकडून 10 लाख वर्षांपूर्वीचे असण्याची शक्यता वर्तविली असली, तरी त्या वेळी लोखंडाचा शोधच लागलेला नाही. अशा प्रकारच्या कातळ शिल्पांचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेणे गरजेचे असून, त्याचे संशोधन होणेही महत्त्वाचे आहे.
डॉ. सचिन जोशी, संशोधक, पुरातत्व विभाग, डेक्कन महाविद्यालय
हेही वाचा