Pune Flower Market Pudhari
पुणे

Pune Flower Market: फुले कोमेजली! मार्केट यार्डातील फूलबाजारात दर्जेदार मालाची टंचाई

सत्तर टक्के मालाला उष्णतेसह मान्सूनपूर्व सरींचा बसला फटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उन्हाळ्याच्या अखेरीस वाढलेली तीव्र उष्णता, वेळेवर सक्रिय न झालेल्या मान्सून तर काही भागात मान्सूनपूर्व सरींनी लावलेल्या हजेरीमुळे फुलांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात येणाऱ्या एकूण फुलांपैकी सुमारे ७० टक्के मालाचा दर्जा घसरला आहे.

यामध्ये पन्नास टक्के मालाला अतिउष्णता तर वीस टक्के मालाला मान्सूनपूर्व सरींचा तडाखा बसला असून, अवघा ३० टक्के मालच दर्जेदार स्वरूपात बाजारात दाखल होत आहे. यामुळे दर्जेदार फुलांना चांगला दर मिळत असला, तरी दर्जाहीन फुलांच्या भावात २० ते ३० टक्क्यांची घसरण झाली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता आणि वाढलेल्या उष्णतेमुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची गरज भागविण्यासाठी व्यापाऱ्यांना परराज्यातून माल मागवावा लागत आहे. या मालामध्येही दर्जेदार फुलांचे प्रमाण कमी आहे. तापमानाचा पारा वाढल्याने त्याचा थेट परिणाम फुलांवर झाला आहे.

अनेक ठिकाणी फुलांचा आकार लहान राहणे, पाकळ्या करपणे, रंग फिका पडणे आणि टिकाऊपणा कमी होणे, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात दाखल होणाऱ्या मालाचा दर्जा घसरला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनीदेखील काही भागातील फुलांचे नुकसान केले आहे.

परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी त्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम नसल्याने मागणीही तुलनेने मर्यादित आहे. धार्मिक कार्यक्रम, मंदिरांमधील वापर आणि दैनंदिन मागणी यावरच बाजार अवलंबून आहे.

त्यामुळे उच्च दर्जाच्या फुलांना चांगली मागणी आणि दर मिळत आहे. तर, फुलांचा टिकाऊपणा कमी झाल्यामुळे किरकोळ विक्रेतेही सावधपणे खरेदी करत आहेत. याचा परिणाम भावावर होत असून, अनेक प्रकारच्या सुट्या फुलांच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

घाऊक बाजारातील फुलांचे भाव

झेंडू : 50-80, गुलछडी : 90-150, अ‍ॅष्टर : जुडी 20-40, सुट्टा 150-200, शेवंती : 100-200, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 20-30, डच गुलाब (२० नग) : 50-150, जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 150-200, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (१0 काड्या) : 100-120, जिप्सोफिला : 200-400, मोगरा : 250-350.

आगामी आठवड्यात मान्सून सक्रिय झाल्यास आणि वातावरणात आर्द्रता वाढल्यास फुलांच्या उत्पादनाला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. बाजारात फुलांची आवक समाधानकारक असली तरी दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. चांगल्या गुणवत्तेच्या फुलांना चांगले दर मिळत आहेत. मात्र, उष्णता आणि पावसामुळे खराब झालेल्या फुलांच्या दरात वीस ते तीस टक्क्यांची घसरण झाली आहे.
- सागर भोसले, अडतदार व समन्वयक, फूलबाजार अडते असोसिएशन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT