पुणे

’वेस्ट टू कंपोस्ट’मधून फुलविली परसबाग

अमृता चौगुले

पिंपळे गुरव : शहरात रोज निर्माण होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करून महापालिकेने मोशीमध्ये उभारलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाढत्या कचर्‍याची समस्या कमी होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील ओल्या – सुक्या कचर्‍यापासून वेस्ट टू कंपोस्ट ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणत पिंपळे गुरवमधील एका गृहिणीने खतनिर्मिती करून सुंदर परसबाग फुलवली आहे.

पिंपळे गुरव येथील नेताजीनगर परिसरात
राहणार्‍या गृहिणी मनीषा पाटील या आपल्या घरातील निर्माण झालेला ओला-सुका कचरा टाकून न देता तो वेगवेगळा करून त्यापासून खतनिर्मिती करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्या घरातील कचर्‍यातून खतनिर्मिती करत आहेत. हे खत वापरून त्यांनी सुंदर परसबाग फुलवली आहे. परस बागेत त्यांनी घेवडा, भेंडी ,वांगी, पालक, अळू, लिंबू, टोमॅटो, वाल, कारले, तोंडली विविध भाज्या पिकविल्या आहेत. या भाज्यांमधून त्यांची रोजच्या भाजीपाल्याची चिंताही मिटल्याचे मनीषा पाटील सांगतात.

परस बागेत गेल्यावर तेथील विविध प्रकारची फुलेही आपले लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये जाई, जुई, जास्वंद , मोगरा, चिनी गुलाब , झेंडू, ब—ह्मकमळ ही फुले आढळून येतात. त्याचप्रमाणे तुळस ,गणेश वेल, शोभेची झाडेही लक्ष वेधून घेतात. घरी केलेल्या खतनिर्मितीतून परसबाग सुंदर बहरली आहे. मनीषा पाटील यांनी बाजारातून एकही वस्तू विकत न घेता त्यांनी घरी बनवलेल्या सेंद्रिय खत आणि जंतूनाशक गोष्टींचा वापर परस बागेसाठी केला आहे.

मनीषा पाटील यांना खतनिर्मितीविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊन कचरा टाकणेही अवघड झाले होते; मात्र घरामध्ये तर रोजच कचरा साठला जात होता. या कचर्‍याचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्यावर कल्पना सुचली. त्यानुसार, ओला व सुका कचरा असे आम्ही घरातील लोक वर्गीकरण करू लागलो. त्यातूनच मग एकेदिवशी एका कुंडीत साठलेल्या कचर्‍यातून तयार झालेले थोडे खत टाकले. त्यामध्ये मिरचीच्या बिया टाकल्या. त्यातून काही दिवसांत छान रोपे तरारून आली, आणि यातूनच मग सेंद्रिय खतनिर्मिती करण्यास सुरुवात करून त्यातूनच परसबाग फुलवण्याचा प्रवास सुरू झाला.

सोसायटीतील महिलांचाही प्रतिसाद
घरी बनवलेल्या ओल्या सुक्या कचरापासून सेंद्रिय खताद्वारे परसबाग होत असल्याने प्रेरणा घेत आजूबाजूच्या सोसायटीतील महिलांनीदेखील खतनिर्मिती करत बाग फुलवत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT