पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गतवर्षीसारखी पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी जलसपंदा विभाग अलर्ट झाला आहे. त्यानुसार पूरनियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तसेच वायरलेस यंत्रणेद्वारे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 70 टक्क्यांपर्यंत आल्यास पूरस्थितीची पूर्वसूचना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना देण्यात येईल. त्यानंतर 90 टक्क्यांवर साठा येताच त्याबाबत दक्षतेचा इशारा देण्यात येणार आहे. (Pune news Update)
खडकवासला धरण भरल्यानतंर मागील वर्षी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबं रस्त्यावर आली होती. त्यावेळी पूर्वसूचना न देता धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्याची टीका करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर, धरण पूर्ण भरण्यापूर्वी आणि धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत.
पावसाच्या स्थितीनुसार पुणे महानगरपालिकेने खबरदारीच्या उपायोयजना करणे अपेक्षित आहे. तसेच नदीपात्रातील राडारोडा आणि अतिक्रमणे काढावीत. पूरस्थितीची माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.श्वेता कुर्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प
जलसपंदा विभागाने पूरनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पूरस्थितीच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी विसंवाद होऊ नये यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे काही कर्मचार्यांची नियंत्रण कक्षात जलसंपदा विभागाने नियुक्ती केली आहे. त्या ठिकाणी वायरलेस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्या यंत्रणेचे मॉक ड्रिल घेण्यात आले असून त्याबाबत जिल्हाधिकार्यांनी खातरजमा केली आहे.
पावसामुळे धरण 70 टक्के भरताच जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा पहिला इशारा देण्यात येईल. त्याबाबत दोन्ही महापालिकांना नियंत्रण कक्षामार्फत कळविले जाईल. 70 टक्क्यांनंतर 90 टक्के धरण भरल्यानंतर तसेच पाणी सोडण्यापूर्वी सतर्कतेचा इशारा देत त्याची माहिती देण्यात येणार आहे, असे जलसपंदा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. नियंत्रण कक्षात वायरलेस यंत्रणेसोबत सॅटेलाईट फोनही उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे माहितीची देवाण-घेवाण करण्यामध्ये सुसंवाद होईल. गेल्या वर्षीही पूरस्थितीची पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र, महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून संबंधित वॉर्डच्या कार्यालयात निरोप देण्यात आला नव्हता, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.