सासवड: सासवड (ता.पुरंदर) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्षाने थेट बंदूक काढून धमकावण्याचा प्रकार शनिवार (दि.२४) मे रोजी घडला होता. याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांचा मुलगा विनय याच्यासह पाच जणांना सोमवारी (दि. २) अटक करण्यात आली. सासवड न्यायालयाने विनय दिलीप यादव, भुजंग यादव, महेश यादव, संकेत यादव, रितेश यादव हे सर्व (रा. मु. यादववाडी पोस्ट हरगुडे ता. पुरंदर) या पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दिलीप यादव (रा. मु. यादववाडी पोस्ट हरगुडे ता. पुरंदर) व एकनाथ खेंगरे, नामदेव खेंगरे, दत्ता खेंगरे (रा. तक्रारवाडी साकुर्डे ता. पुरंदर) हे अद्याप फरार असून तपासात दोषी आढळल्यास त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल, असे सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
शनिवार (दि. २४) मे रोजी केतकी धनंजय झेंडे यांनी याबाबतसासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केतकी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सासवड-हडपसर रोडवरील महाराजा लॉन्स येथे त्यांच्या चुलत भावाचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून ही घटना घडली.