पुणे

इलेक्ट्रिक बॅटरी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग; लाखो रुपयांचे नुकसान

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावरून पुणे येथून दिल्लीकडे दुचाकी वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटरीची भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या कंटेनरला शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. हा बर्निंग ट्रकचा थरार पाहून भीतीचे वातावरण पसरले. ग्रामस्थ, पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्याचा फवारा मारून वेळीच आग नियंत्रणात आणली. दरम्यान कंटेनर मधील सुमारे ९ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या जळून खाक झाल्या. मात्र सुमारे २० लाख रुपये किमतीचा कंटेनर आगीपासून वाचवण्यात यश आले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, हरियाणा येथील उमरदिल हा चालक वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या व कच्चा माल कंटेनर ( RJ06GC 8072) मधून घेऊन पुणे येथून दिल्ली नोएडा येथे निघाला होता. दरम्यान रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कंटेनर येथील बाह्यवळण रस्त्यावर आला असता कंटेनरच्या मागच्या बाजूकडून धुराचे लोट येऊ लागले. याबाबतची माहिती इतर वाहनचालकांनी ट्रक चालकाला दिली. प्रसंगावधान राखून त्यांनी पेटता कंटेनर नवीन बाह्यवळण वळण रस्त्यावरून जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील डेरे यांच्या सर्विस स्टेशनकडे घेण्याची सूचना कंटेनर चालकाला केली. आग लागलेला कंटेनर सर्विस स्टेशनमध्ये पोहोचताच पाईपच्या साह्याने हाय प्रेशरचा पाण्याचा फवारा कंटेनरच्या आतील भागात मारल्याने बॅटरीना लागलेली आग क्षमवण्यात यश आले.

दरम्यान कंटेनरमधील सुमारे दहा लाख रुपयांच्या वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या व कच्चामाल जळून खाक झाला. मात्र आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे सुमारे वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर आगी पासून वाचवण्यात यश आले. पोलीस, ग्राम सुरक्षा दलाचे जवान व स्थानी ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे कंटेनर होणार मोठे नुकसान व महामार्गावरील संभाव्य दुर्घटना टळली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT