पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला आग लागल्याची घटना रविवारी (दि.१९) रात्री आठ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली. अथक प्रयत्नानंतर पथकाकडून आग आटोक्यात आणण्यात आली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी एक मजली वाडा व यामध्ये एकूण चार कुटुंबे राहात होती. सदर ठिकाणी छतावर आग लागल्याचे निदर्शनास येताच कुटुंबातील रहिवाशांनी अग्निशमन दलास पाचारण करीत वाड्याबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने वाड्यात आतमध्ये प्रवेश करून प्रथम कोणी अडकले नाही, खाञी करीत तीन सिलेंडर बाहेर घेत आगीवर पाणी मारून सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणून कुलिंगचे काम सुरु ठेवत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला. या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळाले असून खाली असणाऱ्या दुकानदारांनी त्वरीत मालाचा साठा बाहेर घेतल्याने नुकसान टळले. आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.