काजू उत्पादकतावाढ, प्रक्रिया व्यवस्था हवी बळकट; पणनमंत्री जयकुमार रावल यांचे मत File Photo
पुणे

Pune: काजू उत्पादकतावाढ, प्रक्रिया व्यवस्था हवी बळकट; पणनमंत्री जयकुमार रावल यांचे मत

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची बैठक गुरुवारी (दि. 8) येथील राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्केट यार्डातील मुख्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी ते बोलत होते.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशभरात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर असून, राज्यात काजूची उत्पादकता वाढविण्यास संधी आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून काजू उत्पाकदता वाढवावी आणि उत्पादनानंतर त्यावर होणार्‍या प्रक्रियांमधील अडचणींवर अभ्यासपूर्ण उपाययोजना कराव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. राज्यातील काजू उत्पादकता व प्रक्रियाव्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची बैठक गुरुवारी (दि. 8) येथील राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्केट यार्डातील मुख्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक श्रीधर डुबे पाटील, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने तसेच काजू मंडळाचे सदस्य उपस्थित होते. (Latest Pune News)

ते पुढे म्हणाले की, काजू उत्पादनवाढीसाठी जगातील चांगल्या काजू वाणांचा अभ्यास करून राज्यात लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करावे. काजू पीक आल्यानंतर त्यावर प्रक्रिया व साठवणूक करण्यासाठी महिला गट व कंपन्यांचा सहभाग वाढवावा.

काजूतील ओलावा कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांना गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्या माध्यमातून काजू प्रक्रिया करण्यात महिला बचत गटांचा व महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग वाढेल. त्यांनाही रोजगारनिर्मिती होऊन काजू प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत होईल.

तसेच काजू उत्पादन, त्यावरील प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि मूल्यवर्धन करण्यासाठी जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. काजू उद्योगांना अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करताना व्हिएतनाम, कंबोडिया यांसारख्या देशातील तसेच जगातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते महाराष्ट्रात कसे राबविले जातील, यासाठी काजू मंडळाने नियोजन करावे.

चंदगड, कुडाळमध्ये काजू प्रक्रिया उद्योगाची व्यवहार्यता तपासा

चंदगड आणि कुडाळमध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारण्यासंदर्भात व्यवहार्यता तपासण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. 500 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाच्या उभारणीचेही नियोजन तसेच प्रतिदिन 100 मेट्रिक टन उत्पादनक्षमतेचे प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील, यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. काजू लागवडीपासून ते त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नियोजनपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसे केल्यास काजू उत्पादन व शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढू शकते, असा विश्वासही पणनमंत्र रावल यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT