कोरेगाव भीमा: गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पाणी प्रश्न अखेर सुटला आहे. कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही जागेअभावी गावासाठीची पाणी योजना रखडलेली होती. जागेसाठी सरपंच संदीप ढेरंगे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी गेल्या 9 महिन्यांपासून वन विभागाकडे सतत पाठपुरावा करीत होते. त्यास यश मिळाले असून, कोट्यवधी रुपयांची जागा पाणी योजनेसाठी मोफत मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
कोरेगाव भीमा या ठिकाणी असणार्या भीमा, भामा व इंद्रायणी नदीच्या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, सरपंच ढेरंगे यांनी या पाणी प्रकल्पासाठी वन विभागाची जागा मिळवून देण्यासाठी जुन्नर वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांच्याकडे पाठपुरावा केला.
वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक बबन दहातोंडे यांचेही सहकार्य झाले, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, उपविभागीय अभियंता दत्ता पवार यांच्यासह माजी उपविभागीय अभियंता श्रीकांत राऊत यांचेही मोठे योगदान मिळाले.
वन विभागाने कोरेगाव भीमा येथील पाणी योजनेसाठी वन विभागाची गट नंबर 275 मधील 42 गुंठे जागेची मंजुरी दिली. गेल्या 15 वर्षांपासून कोरेगावकरांना असलेली दूषित पाण्याची अडचण दूर होणार असल्याने ग्रामस्थांनी फटाके वाजवून, पेढे भरवून जल्लोष साजरा केला. (Latest Pune News)
सरपंच ढेरंगे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, ’घोडगंगा’चे माजी संचालक कैलासराव सोनवणे, माजी सरपंच अशोक काशीद, विलास खैरमोडे, संगीता कांबळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, बबुशा ढेरंगे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बबन गव्हाणे, विवेक ढेरंगे, बाळासाहेब वाडेकर, जालिंदर ढेरंगे, अर्जुन गव्हाणे, तानाजी ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.