पुणे

अखेर एमपीएससीने बदलली परीक्षेची तारीख; ही ठरली तारीख

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश चाचणी परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी परीक्षा यंदा 6 जुलै रोजी एकाच दिवशी ठेवण्यात आली होती. दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार होते. याबाबत 12 मे रोजी दै. 'पुढारी'ने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करून एमपीएससीने तारीख बदलावी, अशी मागणी केली होती. अखेर एमपीएससीने ही परीक्षा 6 ऐवजी 21 जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले असून, तसे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 29 डिसेंबर 2023 ला विविध पदांच्या परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी घेण्याचे नियोजन होते. दरम्यानच्या काळात राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद राज्य शासनाने केली. त्यामुळे पदांसाठी सुधारित आरक्षणनिश्चिती करण्यात आली, त्यानंतर 524 जागांसाठी 6 जुलै रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.

परीक्षा 6 जुलै रोजी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. देशस्तरावरील ही परीक्षा असून, तिचे वेळापत्रक 16 एप्रिल रोजी निश्चित झाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 8 मे रोजी परीक्षा 6 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. ती जाहीर करताना आयुष परीक्षेचा विचार केला नव्हता. परिणामी, दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता एमपीएससीने ही परीक्षा 21 जुलैला घेण्याचे निश्चित केले आहे. एमपीएससीने त्यासाठी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नव्याने प्राप्त केल्यास त्यांना इतर मागास प्रवर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याच्या संधीसाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख बदलल्याने आम्ही समाधानी आहोत. यापूर्वी या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्याचे नियोजन झाले होते. त्यामुळे एका परीक्षेला मुकावे लागले असते. दै. 'पुढारी'ने यासंबंधी आवाज उठविला.

डॉ. विराज दत्तात्रय भोसले, परीक्षार्थी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT