पुणे: राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी आता शेवटची फेरी राबविण्यात येणार आहे. 22 ते 30 ऑगस्ट दरम्यान संबंधित फेरी राबविण्यात येणार असून अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतलेला नाही त्यांनी या फेरीत आपला प्रवेश निश्चित करावा अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.
राज्यातील ९ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालयातील २१ लाख ५० हजार १३० जागांसाठी केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत १२ लाख ७८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. (Latest Pune News)
आता प्रवेशासाठी अखेरची फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी २२ ते २३ ऑगस्ट दरम्यान नवीन महाविद्यालयांची नोंदणी करणे तसेच वाढीव प्रवेश क्षमता नोंदणी करता येणार आहे. तर २५ ऑगस्टला प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत. तर २६ आणि २७ ऑगस्टला आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावीचा भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे.
२९ ऑगस्टला संबंधित फेरीसाठी प्रवेश जाहीर करण्यात येणार असून प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २९ आणि ३० ऑगस्टला प्रवेश निश्चित करता येणार आहे. प्रवेशासाठी अद्यापही ८ लाख ७६ हजार ६४७ जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले असून प्रवेशासाठी ही शेवटची फेरी असल्याचे डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले आहे.