पुणे

कचर्‍याने भरले अन् मद्यपींनी हेरले! पुण्यातील ‘या’ उद्यानाकडे नागरिकांची पाठ

अमृता चौगुले
कोथरूड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कर्वेनगर परिसरातील डीपी रस्त्यावर महापालिकेने विकसित केलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी गवत वाढले असून, कचराही साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यासह विविध समस्यांमुळे नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. सध्या या उद्यानात मद्यपी व प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. या उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
नदीपात्रालगत असलेला शिवणे ते खराडी डीपी रस्त्यावर महापालिकेने हे उद्यान तयार केले आहे. या उद्यानात प्रवेश करताच जॉगिंग ट्रॅकमध्ये गवत व झुडपे वाढलेली दिसत आहेत. नागरिकांना बसण्यासाठी उभारलेल्या बाकड्यांशेजारी कचरा पडून आहे. योगा व हास्य क्लबसाठी उभारलेल्या हॉलचीही दुरवस्था झाली असून, भिंतीला तडे गेले आहेत. व्यायामासाठी उभारण्यात आलेल्या ओपन जिमच्या परिसरात गवत उगवले असून, मैदानात खड्डे पडलेले आहेत. हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनले आहे.
दुपारी प्रेमीयुगुले या ठिकाणी अश्लील कृत्ये करीत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. कचर्‍यामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध समस्यांमुळे हे उद्यान 'असून अडचण नसून खोळंबा' ठरत आहे. सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी तळीराम बिनधास्त उद्यानात येतात आणि मद्यपान करतात. प्रशासनाने या उद्यानातील गैरप्रकारांना आळा घालून देखभाल दुरुस्तीसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दोन विभागांची टोलवाटोलवी

या उद्यानाबाबत उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांना विचारले असता ते म्हणाले, 'हे उद्यान आमच्या यादीत नसून ते भवन विभागाने विकसित केले आहे. त्यामुळे त्याची देखभाल-दुरुस्ती भवन विभागाकडून होणे अपेक्षित आहे.' भवन विभागाचे अधिकारी रामदास कडू यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'हे उद्यान आमच्या खात्याने विकसित केले नसून ते उद्यान विभागाने विकसित केले आहे. त्यामुळे उद्यान विभागाने त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.'

या आहेत समस्या…

उद्यानात ठिकठिकाणी गवत, झाडेझुडपे वाढली असून, कचराही साचला आहे.
जॉगिंग ट्रॅक, व्यायामासाठी उभारलेल्या ओपन जिमची दुरवस्था झाली आहे.
रात्री हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनत असून, दुपारी प्रेमीयुगुलांचा वावर असतो.
नागरिकांना बसण्यासाठी उभारलेल्या बाकड्यांचीही दुरवस्था झाली आहे.
या उद्यानात वाढलेले गवत आणि झाडे-झुडपांमुळे नागरिकांना फिरण्यास व लहान मुलांना खेळण्यास अडथळा होत आहे. परिसरात सापांचा वावर असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान भीतीदायक ठरत आहे. या ठिकाणी होणार्‍या गैरकृत्यांना आळा बसवून, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
-सचिन विप्र, 
रहिवासी, कर्वेनगर. 
हेही वाचा
SCROLL FOR NEXT