पुणे

अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरा आजपासून! ‘इतक्या’ जागा उपलब्ध

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्याला आज बुधवार (दि. 5) जूनपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांना प्रवेश हवा असलेल्या कॉलेजांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. ऑनलाइन स्वरूपात हे पसंतीक्रम भरण्यासाठी 5 ते 16 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुसर्‍या भागात विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश हवा आहे असे दहा पसंतीक्रम भरता येतील. केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. अर्जाचा पहिला भाग अद्याप भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनाही पहिला भागही या कालावधीत भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल. अर्जाच्या भाग-1ची पडताळणी झाली आहे, तेच विद्यार्थी भाग-2 भरू शकतील.

याशिवाय, कोटा प्रवेशासाठीही विद्यार्थी ऑनलाइन पसंती नोंदवू शकतात. प्रथम भाग-1 भरला असल्यास त्यामध्ये या कालावधीत सुधारणाही करता येईल. नव्याने भरलेला अथवा दुरुस्त करून भाग-1 प्रमाणित केलेले विद्यार्थी लगेच भाग-2 भरू शकतात. येत्या 16 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अर्जाची पडताळणी येत्या 18 जून रोजी झाली आहे, त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तसेच अर्जाचा भाग-2 लॉक केला जाईल. विद्यार्थ्यांना येत्या 21 जूनपर्यंत या यादीवर हरकती नोंदविता येतील. 26 जून रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रवेशाची यादी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.

याशिवाय फेरीचे कटऑफ गुणही प्रदर्शित केले जातील. येत्या 26 ते 29 जून दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये आपला प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 जुलै रोजी दुसर्‍या नियमित फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जातील. विविध कोटा अंतर्गत असलेल्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रियादेखील याच कालावधीत पूर्ण केली जाईल. येत्या 2 जुलै रोजी दुसरी नियमित प्रवेश फेरी तर 9 जुलै रोजी तिसरी नियमित फेरी आणि 19 जुलै रोजी विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. या फेर्‍यांचे तपशीलवार वेळापत्रकनंतर घोषित केले जाणार आहे.

प्रवेशासाठी यंदा 1 लाख 20 हजार 130 जागा

अकरावी प्रवेशासाठी 70 हजार 641 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 50 हजार 795 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केला आहे. त्यातील 23 हजार 452 विद्यार्थ्यांनी स्वयंपडताळणी करून घेतली आहे, तर 23 हजार 504 विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावर अर्जांची पडताळणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यंदा अकरावी प्रवेशासाठी 339 महाविद्यालयांमध्ये एकूण 1 लाख 20 हजार 130 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 93 हजार 606 जागा कॅप प्रवेशाच्या, तर 26 हजार 524 जागा कोटा प्रवेशाच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT