पुणे

खोरची अंजीर शेती ठरतेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र

अमृता चौगुले

खोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या फळाच्या स्वादिष्ट व रुचकर गोडीने ग्राहकांना वेड लावले आहे ते फळ अंजीर हे आहे. दौंड तालुक्यातील खोर हे एकमेव गाव आहे, की त्या ठिकाणी अंजिराची शेती केली जात असून, मोठ्या प्रमाणावर उत्पादनदेखील घेतले जात आहे. हेच अंजीर क्षेत्र आता जिल्ह्यातील शेतकरी वर्गाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शन व अभ्यास दौर्‍यासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरत असताना दिसत आहे. ग्रामीण भागातील शेती या विषयाकडे पुन्हा एकदा तरुणाई वळली गेली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

आर्थिक उत्पादनाचे मेक मॉडेल आता खोरचे अंजीर क्षेत्र ठरत आहे. खोरमधील अंजीर शेती आणि प्रक्रिया उद्योग पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी, कृषी पदवीधर तसेच प्रशिक्षणार्थी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध विषयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्षभर गावात येण्याचा ओघ हा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

येथील प्रसिद्ध अंजीर शेतीने चक्क जागतिक पातळीवर आपली उंची गाठली आहे. चविष्ट, स्वादिष्ट, गोड असलेल्या अंजिराची गोडी आता देशाबाहेर पोहोचली आहे. एवढेच नव्हे तर नेदरलँड देशातून 20 ग्लोबल फूड्स सप्लायर्स आणि इंडस्ट्री आंत्रप्रेन्योरचा समूह खोर येथे अंजीर शेती पाहणी व अभ्यासासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये आला होता. जागतिक पातळीवर उद्योजकांना खोरच्या अंजीर शेतीने भुरळ घातली आहे.

विद्यार्थी ज्या वेळी अभ्यास करण्यासाठी येत असतात, त्या वेळी अंजीर शेतीची कामे, अंजिराच्या जाती, त्यासाठी आवश्यक हवामान, अंजिरासाठी लागणारी खते, अंजिरातून मिळणारे पोषक घटक, त्यापासून बनणारे विविध पदार्थ, त्यांची विक्री व्यवस्था, भारतातील विविध भागांतील त्यांची मागणी कशी आहे, जगभरात कुठल्या जाती आहेत, ही माहिती त्यांना पुरवली जात आहे. साधारण 3 ते 4 हजार विद्यार्थी व अन्य लोक दरवर्षी भेट देत आहेत.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या प्रक्षेत्र भेट व अभ्यास दौर्‍यांतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शेतकरी येत असतात. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून बरेच अभ्यास दौरे आयोजित केले जातात, त्यात शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी भेट देत असतात. आयसीआयसी फाउंडेशन, कृषी पदवी, अन्नप्रक्रिया पदवी, बिझनेस मॅनेजमेंटचे विद्यार्थी, कृषी व्यवसाय मॅनेजमेंटचे विद्यार्थी या आणि अशा विविध विषयांवर काम करणारे लोक भेट देत असल्याने आज खोरची अंजीर शेती ही जगप्रसिद्ध होण्याकडे आपली वाटचाल करीत असल्याचे मत खोरचे अंजीर उत्पादक शेतकरी समीर डोंबे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT