मंचर : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार (दि. 12) पासून सुमारे पावणेतीन लाख डाक सेवक बेमुदत संपावर जाणार आहेत. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या पुणे ग्रामीण विभागाचे सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिला आहे. गेली अनेक वर्षे डाक कर्मचार्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ चार तासांची असतानाही डाक कर्मचारी आठ तास काम करीत आहेत.
मात्र, त्यांना चार तासाचेच वेतन मिळते. कर्मचार्यांना 8 तासांचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे, विभागीय कर्मचार्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीएीए, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू कराव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये समाविष्ट करण्यात यावे आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. यापूर्वीही संघटनेच्या वतीने मुंबई येथे एक दिवशीय उपोषण करण्यात आले होते. दिल्ली येथे साखळी उपोषण केले होते. मात्र, सरकारने फक्त आश्वासने दिली. मागण्या मान्य न केल्याने 12 तारखेपासून संप करण्यात येणार आहे. त्यात कर्मचार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या पुणे ग्रामीण विभागाचे आंबेगाव तालुका संघटन सचिव हरिभाऊ थोरात यांनी केले आहे.
हेही वाचा :