Fertilizer Booking App Pudhari
पुणे

Maharashtra Fertilizer Booking App: खत बुकिंग ॲपला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एक लाखांहून अधिक नोंदणी

तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर क्यूआर कोडद्वारे खत खरेदीला वेग; १८,५०८ मेट्रिक टन खतांची विक्री

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारतर्फे अनुदानित रासायनिक खत विक्रीसाठीचा ''फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल'' या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत ॲपद्वारे खत विक्रीस येणाऱ्या अडचणी दूर करण्यास कृषी विभागाला यश आले आहे.

त्यामुळे कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळून एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी क्यूआर कोडद्वारे खते खरेदीसाठी बुकिंग केले आहे. तर प्रत्यक्षात दोन्ही जिल्ह्यांतील मिळून 46 हजार 258 शेतकऱ्यांनी 18 हजार 508 मेट्रिक टन खतांची खरेदी केलेली असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी दिली.

कृषी विभागाच्या 17 जूनच्या ताज्या अहवालानुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 हजार 570 मे.टन आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 938 मे.टन खतांची विक्री पूर्ण झाली आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे मोबाईल बेस ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून शेतकऱ्यांना घरबसल्या खतांचे बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

त्यामध्ये ॲपद्वारे लॉगिन होण्यास अडचणी येत होत्या. तसेच, क्यूआर कोडची समस्या येत होती. शिवाय ज्या दिवशी ऑनलाइनद्वारे खत बुकिंग केले, त्याच दिवशी ते मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. बायोमेट्रिकद्वारे खत खरेदी करताना अंगठा सक्तीचा होता. त्यामध्ये आता पर्याय देण्यात येऊन मोबाईलवर ओटीपीही देण्यात आला आहे.

त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीवेळी सुरुवातीस येत असणाऱ्या अडचणी आता कृषी विभागाने संपुष्टात आणल्या आहेत. त्यामुळे खते खरेदीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्याचे कृषी सेवा केंद्रांकडील खते विक्रीवरून दिसत आहे. तसेच, क्षेत्रीय स्तरावर येत असलेल्या अडचणी केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीने तत्काळ सोडविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT