पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : मालकी क्षेत्रात विनापरवानगी अवैध वृक्षतोड केल्याचे प्रकरण नेरे (ता. मुळशी) येथील विकसकाला
चांगलेच महागात पडले. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्ष अधिकारी पौड (ता. मुळशी) संतोष चव्हाण यांनी तब्बल 8 लाख रुपयांचा दंड बजावला आणि तो वसुलही केला. दत्तवाडी (नेरे, ता. मुळशी) येथील वसुंधरा सामाजिक उन्नती वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन सहकारी संस्था मर्यादित यांनी मुळशी वनविभागाच्या कार्यालयात त्यांचे मालकी क्षेत्र सर्व्हे नंबर 38, हिस्सा नं.1 चे एकूण क्षेत्र 06 हे. 33.50 आर इतक्या क्षेत्रात त्यांनी सन 2016 मध्ये लावलेले एकूण 400 वृक्ष व इतर नैसर्गिकरीत्या उगवलेले वृक्ष यांची अवैध वृक्षतोड झालेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता. बाबासाहेब भागूजी बुचडे, अतुल रमेश साठे यांचेसह इतर 30-40 लोकांनी मिळून हे कृत्य केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले होते.
वन विभागाचे घोटावडे वनपरिमंडळ अधिकारी श्रीमती प्रज्ञा बनसोडे, कासारसाई नियतक्षेत्राचे वनरक्षक पांडुरंग कोपणर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पौड यांच्या आदेशानुसार जागेवर जाऊन पहाणी केली असता सुमारे 800-850 झाडांची तोड झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीसाठी आरोपींना नोटीस बजावली असता आरोपींनी गुन्हा कबूल करून शासकीय नियमाप्रमाणे होणारा दंड भरण्यास तयार असल्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी पौड (ता. मुळशी) यांनी एकूण 800 झाडांसाठी प्रतिझाड 1000 रुपयेप्रमाणे एकूण 8 लाख रुपये दंड ठोठावला. सध्या या कारवाईची सर्वच स्तरातून चर्चा होत असून मालकी क्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणात आजअखेर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दंडात्मक कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे मुळशीतील अवैध वृक्षतोड करणार्यांमध्ये खळबळ माजली आहे.
अवैध वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा असून कुठेही विनापरवानगी वृक्षतोड आढळल्यास त्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. वृक्षतोड करणे अनिवार्य असल्यास वनविभागाकडे रीतसर अर्ज दाखल करावा, प्रकरणाची शाहनिशा करूनच नंतर रीतसर परवानगी देण्यात येईल.
– संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुळशी तालुका.
हेही वाचा