पुणे : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. पर्यटनस्थळांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी (दि.17)दिली.
विशेषत: मान्सून काळात वर्षाविहारासाठी येणार्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम तोडतात, हुल्लडबाजी करतात आणि यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. जीवघेण्या दुर्घटना आणि अपघातांच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याचे नवीन पर्यटन धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी झालेल्या घटना, पर्यटनस्थळावर असणार्या त्रुटीचा अभ्यास करून हे धोरण ठरविले जाणार आहे. (Pune News Update)
कुंडमळा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना डुडी म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर शुल्क आकारले जाणार आहेत. पुढच्या 15 दिवसांत पर्यटन धोरण ठरविले जाणार आहे. त्यात हे शुल्क किती असावे, पर्यटन स्थळावरील सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे ठेवली जावी यांची सर्व माहिती असणार आहे.
वन विभाग आणि ग्रामपंचायत यांची संयुक्त समिती असणार्या वन समितीमार्फत याची अंमलबजावणी केली जाईल. ही संयुक्त समिती पर्यटनस्थळावर सुरक्षेच्या उपाययोजना करेल. तिथे बॅरिकेट लावले. पर्यटकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा तयार करेल. एकावेळी तिथे किती पर्यटक असेल, असे सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून ही समिती निर्णय घेईल. सातारा येथे जिल्हाधिकारी असताना पर्यटन स्थळावर अशा प्रकारच्या उपाययोजना केली होती. त्याचा फायदा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे डुडी यांनी सांगितले.
मावळ तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन, आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
कुंडमळा येथे साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 8 फुटांचे दोन पदपथ करण्यात येणार आहेत. तसेच हे पर्यटनस्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्ह्यू गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश या वेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले आहेत.अजित पवार, उपमुख्यमंत्री
अपघातग्रस्त पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्याचे निर्देश देऊन आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व पूल पाडण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.