SPPU Pudhari
पुणे

SPPU Mess License Suspends: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरी मेसचा परवाना तात्पुरता निलंबित

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने एफडीएकडून कारवाई; विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तडजोड नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील रिफेक्टरी मेसचा अन्न व्यवसाय परवाना तात्पुरता निलंबित केला आहे. एफडीएच्या राज्यव्यापी तपासणी मोहिमेअंतर्गत या रिफेक्टरी मेसची तपासणी करण्यात आली असून, त्यात अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भातील विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

एफडीएचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे तसेच अस्वच्छ पद्धतीने अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आस्थापनांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पुणे शहरासह विविध भागांतील खाद्य व्यवसायांची तपासणी केली जात आहे.

विद्यापीठातील रिफेक्टरी मेसमध्ये स्वच्छता, अन्नसाठवण, अन्नहाताळणी आणि सुरक्षित अन्नपुरवठ्याबाबत आवश्यक निकषांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले. यानंतर संबंधित व्यवस्थापनाला सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश एफडीएकडून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, वसतिगृह मेस आणि खाद्य आस्थापनांनी अन्न सुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन करावे; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT