Pune FDA Action on Vaishali and Rupali Hotel Pudhari
पुणे

Pune FDA Action: पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलवर FDAची कारवाई; हॉटेलचे परवाने निलंबित, तपासणीत धक्कादायक त्रुटी उघड

Pune FDA Action on Vaishali and Rupali Hotel: पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल आणि रूपाली रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे.

Rahul Shelke

Pune FDA Action on Vaishali and Rupali Hotel: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या दोन्ही हॉटेल्सवर कठोर कारवाई करत त्यांचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. एफ.सी. रोडवरील या दोन्ही लोकप्रिय हॉटेल्समध्ये तपासणीदरम्यान अन्न सुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची FDA कडून तपासणी सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील दोन प्रसिद्ध हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, स्वयंपाकघराची व्यवस्था आणि अन्न हाताळण्याच्या पद्धतींमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या.

तपासणीत वैशाली हॉटेलला 98 पैकी फक्त 58 गुण

अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी 13 नोव्हेंबर 2026 रोजी हॉटेल वैशालीची तपासणी केली. या तपासणीत हॉटेलला 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले आहेत.

तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील जागा अपुरी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, कच्चा माल ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवण्यात आले होते. डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवाही पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आल्याचे आढळले.

याशिवाय, शिजवलेला भात, उकडलेले बटाटे आणि इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याचे कामही सुरक्षित जागेत होत नसल्याचे तपासणीत समोर आले.

अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक गंभीर बाब आढळली. कापलेल्या कच्च्या भाज्या थेट तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे कच्च्या पदार्थांमधील जंतू तयार अन्नात जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अन्नपदार्थ योग्य तापमानात ठेवले जात नव्हते.

विशेष म्हणजे, जून 2026 मध्येही या हॉटेलची तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गंभीर त्रुटी कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

रूपाली रेस्टॉरंटमध्येही स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष

हॉटेल वैशालीसोबतच एफ.सी. रोडवरील रूपाली रेस्टॉरंटवरही FDA ने कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी 13 नोव्हेंबर रोजी या रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीबाबत अनेक त्रुटी आढळल्या.

रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धूळ, घाण आणि कीटक अन्नपदार्थांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचलेले होते. साफसफाई व्यवस्थित केली जात नसल्याचेही आढळले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धतही योग्य नव्हती.

अन्नपदार्थ ठेवण्याच्या पद्धतीतही त्रुटी होत्या. कच्चा माल, अर्धवट तयार केलेले पदार्थ आणि शिजवलेले अन्न योग्य प्रकारे झाकून ठेवले जात नव्हते. काही पदार्थांवर आवश्यक लेबल आणि वापरण्याची अंतिम तारीखही नव्हती.

कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवण्याच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही समोर आले. अन्नपदार्थ कोणत्या तापमानात ठेवले जात आहेत, याच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. या सर्व बाबींची दखल घेत प्रशासनाने रूपाली रेस्टॉरंटचा परवानाही निलंबित केला.

परवाना निलंबित; पार्सल आणि होम डिलिव्हरीलाही बंदी

FDA ने केलेल्या या कारवाईनंतर दोन्ही हॉटेल्सना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित हॉटेल्सनी आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पुन्हा तपासणी केली जाईल.

पुनर्तपासणीत अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच विभागाकडून लेखी परवानगी दिली जाईल. तोपर्यंत या दोन्ही हॉटेल्सना ग्राहकांना अन्न विकणे, पार्सल देणे किंवा होम डिलिव्हरी करणे यापैकी कोणताही व्यवसाय करता येणार नाही.

सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील वैशाली आणि रूपाली ही दोन्ही हॉटेल्स अनेक वर्षांपासून खवय्यांच्या पसंतीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे या हॉटेल्सवर झालेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT