Tukaram Mundhe Pudhari
पुणे

Milk Adulteration Control: दूध भेसळीवर कडक कारवाईसाठी एफडीएची मोठी बैठक; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत धोरणात्मक चर्चा

राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संस्थांचा सहभाग; गुणवत्ता मानके आणि अन्नसुरक्षा नियम अधिक प्रभावीपणे लागू करण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या शुक्रवारी (दि.12) मुंबईमध्ये राज्यातील प्रमुख दूधाचे सहकारी व खाजगी दूध उत्पादक संस्थांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीला अटकाव करण्यासाठी विभागाने मोहिम हाती घेतली असून अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संबंधित घटकांचेही मत बैठकीद्वारे अजमावून कडक अंमलबजावणी करण्यासाठीचे नियोजन संयुक्त बैठकीतून अपेक्षित मानले जाणार असल्याची माहिती दुग्ध उद्योगातून मिळाली.

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सह आयुक्त (अन्न) म.ना. चौधरी यांनी या बाबतचे पत्र दुध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघास दिले आहे. ज्यामध्ये सहकारी दूध संघाचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य व प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यातील दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगांमध्ये अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करण्यात येत आहे. त्याच उद्देशाने येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात (बांद्रा-पूर्व, मुंबई-४०००५१) या ठिकाणी राज्यातील प्रमुख दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ प्रक्रिया आस्थापनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांशी संबंधित अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत लागू असलेले नियम व नियमने यांमधील विविध कायदेशीर तरतुदी, उत्पादक व प्रक्रिया आस्थापनांच्या जबाबदाऱ्या, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा, अन्न सुरक्षा व्यवस्थांपन प्रणाली तसेच नियामक अनुपालनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून भेसळीच्या उच्चाटनासाठी सर्व स्तरावर प्राधान्याने कारवाई केली असून त्याचे चांगले दृष्यपरिणाम प्रत्यक्ष बाजारपेठांमध्ये दिसू लागले आहेत. विशेषतः दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळखोरांवर थेट कारवाई होऊ लागल्यामुळे सहकारी व खाजगी दूध उत्पादक संस्थांकडील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मालाच्या खरेदीस ग्राहकांनी पसंती दिलेली आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच या विभागाच्या कारवाईचा फायदा प्रत्यक्षात दूध उद्योगास आणि पर्यायाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून दुधाला अधिक दर मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष व प्रकाश कुतवळ, मानद सचिव, दुध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT