वेल्हे: तांत्रिक, ऑनलाइन कामे अशा कामांसाठी लॅपटॉप व इतर मदत मिळावी, या मागणीसाठी राज्यातील कृषी सहायक 15 मेपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा सर्वांत मोठा फटका मध्यमवर्गीय, छोट्या शेतकर्यांना बसला असून, भात आणि भुईमूग अशा खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी बियाणे, खत आदी मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या संपामुळे बीज प्रक्रियांचे प्रशिक्षण, शेतमाल निर्यात, खते, बियाणे वाटप करणे, यासह पीक नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत.(Latest Pune News)
सध्या राजगड, मुळशी, हवेली, भोरसह जिल्ह्यात खरिपाच्या मशागती सुरू आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मान्सूनपूर्व वादळी पावसाने जिल्ह्यात आंबा फळबागा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
पंचनामे कण्यासाठी कृषी सहायक फिरकलेच नाहीत. अशीच गंभीर स्थिती बियाण्यांच्या पुरवठ्याची झाली आहे. शेतकर्यांना बियाण्यांची गरज आहे. मात्र, योग्य बियाण्यांची मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
दरम्यान, आंदोलन स्थगित करण्यात यावे; अन्यथा पर्यायी व्यवस्था म्हणून कृषी सहायक या पदावर तातडीने इतरांची नियुक्ती करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. तांत्रिक कारणांसाठी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बेमुदत संप करणे म्हणजे शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
कृषी सहायकांच्या अडचणी सरकारने सोडविणे गरजेचे आहे. शेतकर्यांपर्यंत योजना पोहचण्यासाठी त्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. संपामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.- मुरलीधर जावळकर, शेतकरी, खानापूर (ता. हवेली)
महाडीबीटीअंतर्गत शेतकर्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी यांत्रिकीकरण व इतर ऑनलाइन कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागतात. त्यासाठी लॅपटॉप व प्रिंटर मिळावेत. यासह तांत्रिक कामांसाठी आर्थिक निधी व इतर मदत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी संप सुरू आहे.- अशोक राठोड, कार्यकारी सदस्य, पुणे जिल्हा कृषी सहायक संघटना