नारायणगाव: जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. नारायणगाव, वारुळवाडी, आळेफाटा, आंबेगव्हाण, येडगाव, जुन्नर, आर्वी, पिंपळगाव, गुंजाळवाडी, खामुंडी, उंब्रज, ओतूर, राजुरी आदी भागांमध्ये जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला असून, शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (Latest Pune News)
काळवाडी, उंब्रज व खामुंडी परिसरात पावसाने ऊस व मका पिके जमीनदोस्त झाली असून, उंदरांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. साखर कारखाने बंद असल्यामुळे पडलेला ऊस साठवून ठेवण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कापणी केलेली बाजरी भिजली आहे, त्यामुळे ती खाण्यास अयोग्य ठरणार आहे. आंब्याच्या झाडांवरील कैर्या गळाल्याने आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले आहे.
आंबेगव्हाण येथील आदिवासी शेतकरी विलास डोके यांच्या पाऊण एकर टोमॅटो पिकाचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. पाऊस इतका जोरदार होता की, डोंगरावरून आलेले पाणी थेट शेतात घुसले आणि संपूर्ण पिके वाहून गेली. येडगाव व नेहकरवाडी भागातही टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. टोमॅटोची फळे काळी पडून खराब होत आहेत.
सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असतानाही शेतकर्यांना तोट्याला सामोरे जावे लागत आहे. झेंडू व इतर फुलशेतीला देखील या पावसाचा फटका बसला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, ही शेतकर्यांची मागणी आहे.