ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि माळशेज घाटपट्टा हा राज्यभर दर्जेदार कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा उत्पादन जोमात असूनही बाजारभावाने सपाटून मार दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारभाव मिळेल या आशेवर शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. पण आता त्याच चाळीत कांदा सडू लागल्याने शेतकर्यांच्या परिश्रमांवर आणि आशांवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
दर वर्षी ओतूर बाजार समितीत सर्वदूर भागातून कांदा विक्रीस आणला जातो. यंदाही दर्जेदार कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. मात्र सुरुवातीपासूनच कांद्याचे दर नीचांक गाठत राहिल्याने अनेक शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला. तरीही, बदलत्या हवामानाचे चटके, अवकाळी पाऊस, उष्मा यामुळे टिकावू मानला जाणारा ’कनेसर’ बियाण्याचा कांदादेखील डिसेंबरच्या आधीच सडू लागला आहे. परिणामी, संपूर्ण कांदा पीक वाया गेले असून, त्याचसोबत मेहनत, खर्च व भांडवलही वाया गेले आहे. (Latest Pune News)
शेतकरी वर्ग पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे. कांद्याचा दर्जा उत्तम असूनही बाजारभाव मात्र अत्यंत कमी - अवघा 10-12 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. दुसरीकडे, पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते आणि एवढ्या मेहनतीने पिकवलेला कांदा त्याच्या अर्ध्या दराने विकावा लागतो, ही खेदजनक परिस्थिती असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
सरकारने किमान 50 रुपये प्रतिकिलो दराने चाळीत साठवलेला कांदा खरेदी करावा, अशी मागणी अनेक शेतकरी संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे. ‘नीचांकी भाव देऊन आमची टिंगल करू नये,’ अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांमधून उमटत आहेत.
ओतूर कांदा ‘ब्रँड’ म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. पुणे, फुरसुंगी बाजारात ‘रांगडा’ नावाने या कांद्याची मोठी मागणी असते. पण यंदा सरकारकडूनही अपेक्षित पावले उचलली गेली नाहीत, अशी खंत उत्पादक व्यक्त करत आहेत. सध्या कांदा उत्पादक हताश आणि अस्वस्थ आहेत.