राज्यात ‘अ‍ॅग्रिस्टॅक’अंतर्गत शेतकरी नोंदणीचा 1 कोटीचा टप्पा ओलांडला Pudhari News Network
पुणे

Agristack Registration: राज्यात ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ अंतर्गत शेतकरी नोंदणीचा 1 कोटीचा टप्पा ओलांडला

एकूण वहितीधारक शेतकरी संख्येच्या 59.36 टक्के नोंदणी झाली पूर्ण; कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकर्‍यांना देणे सुलभ होण्याकरिता केंद्र सरकारने अ‍ॅग्रिस्टॅक अर्थात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अ‍ॅग्रिकल्चरल ही योजना राज्यात राबविण्यास मान्यता दिली.

त्याअंतर्गत राज्यात सुमारे 1 कोटी 1 लाख 57 हजार 407 शेतकर्‍यांची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी दिली.(Latest Pune News)

राज्यात 11 व्या कृषी गणनेनुसार वहितीधारक खातेदार शेतकर्‍यांची संख्या 1 कोटी 71 लाख 10 हजार 697 इतकी आहे. त्यापैकी झालेली नोंदणी 1 कोटी 1 लाख 57 हजार 407 असल्याने सुमारे 59.36 टक्के नोंदणी 4 जूनअखेर पूर्ण झालेली आहे. तर प्रत्यक्षात महसूल व कृषी विभागाकडून त्यापैकी 84 लाख 48 हजार 681 शेतकर्‍यांची झालेली नोंदणी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शेतकर्‍यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकर्‍यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

तसेच केंद्र व राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा लाभ शेतकर्‍यांना सुलभ, पारदर्शक पध्दतीने वेळेवर उपलब्ध करणे. शेतकर्‍यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.  

शेतकर्‍यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, शेतकर्‍यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पध्दत विकसित करणे हासुध्दा उद्देश आहे. कृषी योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक योजनेतंर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा 15 एप्रिल 2025 पासून अनिर्वाय करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांची संख्या

पालघर 114710, ठाणे 71047, रत्नागिरी 218627, रायगड 128846, सिंधुदूर्ग 112170, नाशिक 525088, अहिल्यानगर 649348, पुणे 525339, सातारा 485980, सांगली 381367,कोल्हापूर 437767, सोलापूर 517366, बुलडाणा 374287, लातूर 332854, हिंगोली 193516, परभणी 286738, धाराशिव 289279, नांदेड 428376, छत्रपती संभाजीनगर 372407, बीड 417438.

तसेच गडचिरोली 151258, गोंदिया 221504, भंडारा 201868, चंद्रपूर 274234, वर्धा 181084, यवतमाळ 338467, अकोला 207690, जळगांव 446317, नागपूर 217820, अमरावती 301962, वाशिम 169791, नंदुरबार 105297, धुळे 166909, जालना 310328 यांचा समावेश असल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT