Farming Crisis Pudhari
पुणे

Farming Crisis: रोज 500 रुपये, तरी शेतमजूर मिळेना! उत्पादन खर्च वाढला

मात्र उत्पन्नात घट, शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: रोज 500 रुपये मजुरी देऊनही शेतमजूर मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्च प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. वाढते इंधनदर, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणारा अनिश्चित दर यामुळे उत्पन्न घटत असून शेतीचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे.

कृषिप्रधान देशात मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असला, तरी शेती पूर्णतः पावसावर अवलंबून असल्याने अनिश्चिततेचे सावट कायम आहे. पावसाचा उशीर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. मागील काही वर्षांपासून या संकटांची तीवता वाढत चालली आहे.

त्याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. बियाणे, खते, औषधे, इंधन यांचे दर वाढल्याने पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्च वाढला आहे. सध्या एक एकर शेतीसाठी सुमारे 4 ते 5 हजार रुपये खर्च येत असून, त्यामानाने उत्पन्नात वाढ होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्‌‍या अडचणीत सापडला आहे.

मजुरीचे दर वाढले असले तरी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे कठीण होत आहे. काही ठिकाणी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असला तरी इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या भाड्यातही वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत ट्रॅक्टरच्या तासिक दरात सरासरी 100 रुपयांनी वाढ झाल्याचे ट्रॅक्टर मालक सुशांत भुजबळ, रोहन भुजबळ यांनी सांगितले.

अल्पभूधारकांची अडचण

शेती करताना उत्पन्नापेत्रा उत्पादन खर्च जास्त करावा लागतो. तसेच मजूर मिळविताना अडचणी येतात. या स्थितीमुळे अल्पभूधारकांची मोठी अडचण झाली आहे.

प्रतिएकर ट्रॅक्टरचे दर

नांगरणी (3500), काकरणे डबल (3000), रोटरणी (3500), पेरणी (2000), सरी काढणे (2500), पाचटकुट्टी (3500)

दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतीतून हाती काहीच आले नाही. त्यातच आता मजुरीचे दर वाढले आहेत. पुरुषांना 400 - 500 रुपये, तर महिलांना 300-350 रुपये रोज देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेती करणे जिकरीचे झाले आहे.
- नारायण पवार, शेतकरी सुकलवाडी
शेतीला समस्यांचे ग््राहण लागले आहे. कधी पावसाचा फटका बसतो, तर काहीवेळा दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा तोटा सहन करावा लागतो. सध्या तर शेतीचा पेरणी ते काढणीचा खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे शेतीवर भरवसा ठेऊन राहणे कठिण बनले आहे.
-धनंजय गायकवाड, शेतकरी वाल्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT