

चाकण: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आणि तिचा गर्भपात केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने (वय 24, सध्या रा. वासुली फाटा) महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
मुख्य आरोपी कमलेश गाडेकर (वय 26, रा. सवासनी, ता. जफराबाद, जि. जालना) याच्यासह त्याचे वडील गणेश आबा गाडेकर (वय 50) आणि आई अंबिका गणेश गाडेकर (वय 45) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
पीडित तरुणीची ओळख कमलेश गाडेकर याच्याशी राहत्या ठिकाणी झाली. ओळख वाढल्यानंतर त्याने तिच्याशी मोबाईलवर व प्रत्यक्ष भेटीत संपर्क ठेवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. ‘तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आपण लग्न करू,’ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढील काही महिन्यांत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, तरुणी गर्भवती झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली; मात्र, आरोपीने टाळाटाळ सुरू केली.
तक्रारीनुसार, आरोपीने तिला दवाखान्यात नेऊन गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. त्या घेतल्यानंतर तिचा गर्भपात झाला. यानंतरही तिने वारंवार लग्नाची मागणी केली असता आरोपीने नकार दिला आणि नंतर आपल्या आई-वडिलांसह मूळ गावी निघून गेला.
यानंतर पीडित तरुणीने आरोपी व त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधून लग्नाबाबत विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करत धमक्या दिल्या आणि ‘हे लग्न होणार नाही’ असे स्पष्ट सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.