कडूस: सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात खेड तालुक्यातील कडूस येथील शेतकरी ह.भ.प. नामदेव भिकाजी ढमाले या शेतकर्याने आपल्या शेतातील उभ्या पिकांना पाणी देणे थांबवून गावासाठी स्वमालकीच्या विहिरीचे पाणी दिले आहे. त्यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान तर भागलीच पण ग्रामपंचायतचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचला आहे. यामुळे या शेतकर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेतकरी ढमाले यांना 4 ते 5 एकर शेती आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, बाजरी, भुईमूग तसेच तरकारी पिके घेतली आहेत. मात्र, दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून गावाची पाणीपुरवठा योजना कोलमडली आहे. गावपरिसरातील सर्वच विहिरींनीची पाणी पातळी घटली आहे. (Latest Pune News)
अशा पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकदा पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. तर याच भागात काहींनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमावत आहेत. याउलट शेतकरी ढमाले यांनी आपल्या शेतातील उसासह इतर पिकाला पाणी देणे थांबवून ग्रामस्थांसाठी मोफत पाणी खुले केले.
ऐन पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांसाठी गावात मोफत पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांची भटकंती थांबण्यास मदत झाली. त्यामुळे गावातील महिला व तरुणांकडू मोठे समाधान व्यक्त होत आहे.
या दानशूरपणाबद्दल गावच्या सरपंच हेमलता खळदकर यांच्या हस्ते शेतकरी ह.भ.प. नामदेव ढमाले, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष ढमाले यांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक उमेश ढमाले, संतोष ढमाले, मिननाथ ढमाले, माजी सभापती किसन नेहेरे, लक्ष्मण मुसळे, आप्पासाहेब धायबर, किशोर शेळके, बाळासाहेब पांगारे, मोहन गारगोटे, प्रकाश बोर्हाडे, अमित गोडसे, भगवान ढमाले, आनंदा धानापुणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पिकांपेक्षा माणुसकी खूप महत्त्वाची आहे. कडूस गावाला मोफत पाणी देण्यातच खूप समाधान वाटते. तसेच श्री क्षेत्र कुंडेश्वर येथील गोशाळेत शंभरहून अधिक गाईंना चारा उपलब्ध करून देणार आहे.- संतोष ढमाले, संचालक, खरेदी विक्री संघ