पुणे

पुणे : स्टार्टर पेटीचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अमृता चौगुले

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील बंडू बबुशा नरवडे (वय ४५) या शेतकऱ्याचा गुरुवारी (दि. २१) विदयुत पंपाच्या स्टार्टर पेटीचा शॉक लागुन दुर्देवी मृत्यू झाला आहे.

बंडू हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी इझिरे पाझर तलावाजवळील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी स्टार्टर पेटीचा शॉक लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस जवान विशाल पालवे, महावितरणचे कर्मचारी यांनी भेट दिली असून, घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणे तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी उपसरपंच अभिजित लंघे व ग्रामपंचायत सदस्य भोलेनाथ पडवळ यांनी केली आहे.

सविंदणे परिसरात महावितरणचा सावळा-गोंधळ

सविंदणे परिसरात वीज खांबांवरील तारा जीर्ण झाल्या असून बऱ्याच ठिकाणी त्या लोंबत आहे. तसेच विद्युत रोहीत्रांच्या फ्युज बॉक्सचीही दूरवस्था असून गावाला वायरमन देखील उपलब्ध नाही. त्यामुळे धोका पत्करून शेतकऱ्यांना फ्युज, डिओ टाकावा लागत आहे. त्यात सातत्याने होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला असून, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT