Pandharpur Wari Pudhari
पुणे

Pandharpur Wari: वारीतल्या पावलांना ‘आधार’ आणि पंढरीची आस

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: टाळ-मृदंगांचा गजर, विठुनामाचा जयघोष आणि खांद्यावर मानाची पताका घेऊन पंढरीच्या वाटेवर लाखो पावले चालत आहेत. पण, या गर्दीत एक अशीही दिंडी आहे, जी फक्त विठ्ठलदर्शनासाठी चालत नाही, तर ती आपल्या विस्कटलेल्या संसाराची राख कपाळावर लावून उभ्या महाराष्ट्राला एक आर्त साद घालण्यासाठी चालते आहे.

ही दिंडी आहे त्र्यंबकेश्वर येथील 'आधारतीर्थ आश्रमा'तील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची! यंदा या चिमुरड्यांच्या वारीचे हे सलग १५ वे वर्ष आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात राहणारी ही मुले आळंदीपासून पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहेत. आळंदी ते सासवड आणि पुढे पंढरपूरपर्यंतचा प्रवास ही मुले पायी पूर्ण करणार आहेत.

संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दिंडीत महाराष्ट्रातील जवळपास २७ जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले सहभागी झाली आहेत. वयाच्या ज्या वर्षात खेळायचं-बागडायचं, त्या वयात डोक्यावरून बापाचं छत्र हरवलेल्या या मुलांच्या चेहऱ्यावर वारीत एक वेगळंच तेज आणि संयम पाहायला मिळतो आहे.

माझ्या बाबांनी चूक केली, तुम्ही करू नका

​वारीत सहभागी झालेल्या या मुलांच्या खांद्यावर विठ्ठलाचे नव्हे, तर 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये' हा संदेश देणारे फलक होते. वारीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, गावकऱ्याला आणि पर्यायाने देशाच्या अन्नदात्याला ही मुले एकच विनंती करीत आहेत, 'आमच्या बाबांनी परिस्थितीला कंटाळून फाशी घेतली; पण तुम्ही तसं करू नका. मागे आमच्यासारखी पोरं पोरकी होतात.' हा संदेश वाचून आणि या मुलांच्या चेहऱ्यावरील निष्पाप भाव पाहून अनेक वारकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत.

​१५ वर्षांचे सातत्य; वारी ठरतेय दुःख विसरण्याचे माध्यम

​गेल्या १५ वर्षांपासून ही दिंडी नित्यनियमाने वारीत सहभागी होत आहे. आश्रमातील व्यवस्थापकांनी सांगितले की, ही मुले जेव्हा आश्रमात येतात तेव्हा त्यांच्या मनात एक मोठी पोकळी आणि भीती असते.

पण, वारीत आल्यावर मिळणारी माउलींची माया, वारकऱ्यांचे प्रेम, यामुळे त्यांना जगण्याची नवी ऊर्जा मिळते. वारी या मुलांसाठी केवळ धार्मिक विधी नाही, तर त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे माध्यम बनली आहे.

​२७ जिल्ह्यांची वेदना एकाच छताखाली

​महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधून आलेली ही मुले आज आधारतीर्थ आश्रमात एकत्र राहतात. प्रत्येकाची कहाणी वेगळी असली, तरी प्रत्येकाचे दुःख एकच आहे. वारीनिमित्त ही सगळी मुले एकत्र येऊन समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. ​

वारीतल्या इतर दिंड्यांमध्ये सुखाची आणि आनंदाची देवाणघेवाण होत असताना आधारतीर्थाची ही दिंडी मात्र समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरते. सासवडच्या मुक्कामातही या चिमुकल्या वारकऱ्यांनी आपल्या शिस्तीने आणि संदेशाने सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT