Husband Wife fight Pudhari
पुणे

Pune News: चाळिशीच्या उंबरठ्यावरील पती-पत्नीमध्ये किराणा भरण्यावरूनचा वाद अखेर पुण्यातील कोर्टात मिटला

समुपदेशनादरम्यान पती-पत्नीचे एकमेकांविरोधातील तीन दावे मागे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या विश्वास आणि विनया (नावे बदलली आहेत) या दाम्पत्याच्या ‌’किराणा का भरत नाहीस?‌’ या विषयावरून होत असलेला वाद थेट न्यायालयात पोहचला. समुपदेशकांनी पती-पत्नीची समजूत घालत मुलांच्या भवितव्यासाठी नात्याची उसवलेली वीण पुन्हा सांधण्याचे आवाहन केले.

समुपदेशनामुळे दाम्पत्याने कटुता विसरून पुन्हा एकत्र यायचा निर्णय घेतला. एकमेकांविरोधात केलेले तीन दावे तडजोडीने मागे घेतले अन् किराणा भरण्याचा वाद अखेर कोर्टात मिटला. विश्वास आणि विनया दोघांचा विवाह 2000 मध्ये झाला. विश्वास फर्निचर व्यावसायिक असून, विनया गृहिणी आहे. त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो, तर मुलगी शाळेत जाते. (Latest Pune News)

विश्वासची आई या दाम्पत्याच्या घरखर्चाला हातभार लावत होती. तोपर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, तिचे निधन झाल्यानंतर दाम्पत्यामध्ये वाद वाढू लागले. पती किराणा भरत नाही, अशी तक्रार पत्नीने केली. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. रागाच्या भरात पतीने थेट विभक्त राहण्यासाठी न्यायालयात धाव घेतली, तर पत्नीने तात्पुरत्या पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला.

पती-पत्नीमध्ये भांडण झाले, तरी कुठे थांबायचे, हे समजायला हवे. छोटी गोष्ट ताणल्यास पराचा कावळा होऊन वाद टोकाला पोहचतात. त्यामुळे आम्ही हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठविण्याची विनंती न्यायालयाला गेली. समुपदेशकांनी समजावून सांगितल्यानंतर दाम्पत्यांमधील वाद मिटून दोघे पुन्हा एकत्र आले.
- ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे, पत्नीच्या वकील

कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा अर्ज मंजूर करीत तिला व मुलीला दरमहा सात हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला. मात्र, पतीने तीन वर्षे पोटगीच दिली नाही. त्यामुळे दोन लाख अठरा हजार रुपयांची थकीत पोटगी मिळावी, यासाठी पत्नीच्या वकिलांनी न्यायालयात दाद मागितली.

त्यामुळे दोघे विभक्त राहणे, पोटगी आणि थकीत पोटगी असे तीन दावे न्यायालयात लढत होते. कौटुंबिक न्यायालयाने हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठविले. पत्नीतर्फे ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे आणि पतीतर्फे ॲड. प्रियंका जहागीरदार यांनी काम पाहिले. त्यांच्यासमवेत समुपदेशक शानूर शेख यांनी पती-पत्नीचे समुपदेशन केले.

त्यांनी या दाम्पत्याची समजूत घालत त्यांच्यामधील कटुता कमी केली, तसेच मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दोघांनी तडजोड करायचे ठरविले. त्यानुसार पतीने पत्नीला घरखर्चासाठी दरमहा सात हजार रुपये, वर्षभरात थकीत पोटगीचे दोन लाख रुपये आणि तिचे गहाण ठेवलेले बारा तोळे सोने देण्याची तयारी दर्शविली आणि मुलीचे संपूर्ण शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची जबाबदारी घेतली, तर पत्नीने पतीविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास संमती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT