पुणे : विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे पोलिस आयुक्तालयाच्या पार्किंगमध्ये थांबले होते. त्या वेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. त्याने आपण आयपीएस अधिकारी असून, झोन-1 चे रावले साहेब माझे बॅचमेट असल्याचे सांगितले. तेवढ्यात स्वतः रावले पोलिस आयुक्तालयात आले. भाजीभाकरे यांनी त्यांना संबंधित व्यक्तीबाबत विचारले असता, सागर वाघमोडेबाबत मला माहिती आहे. त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाणे हरिद्वार उत्तराखंड येथे तोतया आयपीएस अधिकारी असल्याचा गुन्हा दाखल आहे अन् अशा प्रकारे पोलिस आयुक्तालयात आयपीएस अधिकारी म्हणून मिरविणाऱ्या तोतयाचे बिंग फुटले.(Latest Pune News)
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकारी सागर वाघमोडे (रा. नेरुळ, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. भाविक जितेंद्र शहा (वय 37, रा. घोरपडी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 31 ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया वाघमोडे याची पत्नी पोलिस अधिकारी असल्याची माहिती आहे. फिर्यादी शहा यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. तोतया वाघमोडे आणि शहा यांचा मागील तीन-चार वर्षांपासून परिचय आहे. त्याने शहा यांना आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. 31 ऑक्टोबर रोजी वाघमोडे याने शहा यांना फोन करून मेट्रो स्टेशन येथे बोलावून घेतले.
त्या वेळी वाघमोडे याने शहा यांना सांगितले की, इन्कम टॅक्स कमिशनर, डीसीपी भाजीभाकरे, एसीपी संगीता आल्फान्सो हे माझ्या ओळखीचे आहेत. त्या दिवशी वाघमोडे याने शहा यांना सोबत घेऊन महापालिका अतिरिक्त आयुक्त, एसीपी लष्कर, इन्कम टॅक्स आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर दोघे दुपारी चारच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. पार्किंगमध्ये डीसीपी भाजीभाकरे यांची वाघमोडे याने भेट घेऊन आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर परिमंडल-1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले माझे बॅचमेट आहेत, असे सांगीतले. तेवढ्यात तेथे रावले आले. त्यांनी तोतया वाघमोडे याला ओळखले अन् त्याचे बिंग फुटले. यानंतर बंडगार्डन पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी पोलिस आयुक्तालयातून वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सागर वाघमोडे नावाची व्यक्ती आपण स्वतः आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून वावरत होती. पोलिस आयुक्तालय परिसरातून त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन