पुण्यात 44 लाखांची खंडणी उकळली Pudhari
पुणे

Extortion Nilesh Ghaywal: पुण्यात 44 लाखांची खंडणी उकळली! सराईत गुंड घायवळ भावांसह 13 जणांवर गुन्हा

शाळेतील क्रीडा शिक्षकासह टोळीचा सहभाग; वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रारीवरून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कर्वेनगर, शिवणे परिसरातील नामवंत शाळांतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून गुंड घायवळ टोळीने तब्बल 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यामध्ये एका शाळेतील क्रीडा शिक्षकाचा देखील समावेश आहे. या प्रकरणी गुंड नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह तेरा जणांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरुद्ध आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(Latest Pune News)

याप्रकरणी एका खासगी कंपनीतील 40 वर्षीय संचालक महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर आणि बबलू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 40 वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी भागीदारीत एक कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या कंपनीचे कार्यालय प्रभात रस्ता परिसरात आहे. या कंपनीकडून कर्वेनगर, शिवणे भागातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ, तसेच वाहतूक सुविधा पुरविली जाते.

शाळांना नियमित भेट देण्यात येत असल्याने महिलेची शाळेतील कर्मचाऱ्यांशी ओळख झाली होती. कर्वेनगर भागातील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारा आरोपी बापू कदम याच्याशी महिलेची ओळख झाली होती. 2024 मध्ये कदमने महिलेची भेट घेतली. त्याने सांगितले ‌‘माझी कोथरूड भागात डेअरी आहे. त्यामुळे शाळेतील उपाहारगृहात दूध आणि पनीर पुरवठा करण्याचे काम मला द्या. माझ्याकडून पनीर, दूध खरेदी करा‌’, असे त्याने सांगितले. दरम्यान, कदम याचा गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची माहिती महिलेला मिळाली होती. त्यानंतर कदमच्या खात्यात महिलेने 22 लाख दोन हजार रुपये वेळोवेळी पाठविले. मात्र, त्याने पनीर, दूध पुरवठा केला नाही. महिलेने बाहेरून पनीर, दूध खरेदी करून शाळेतील उपाहारगृहाला पुरविले. पैसे घेऊनही माल न पुरविल्याने महिलेने त्याच्याकडे विचारणा केली. जानेवारी 2025 मध्ये कदम याने महिलेची भेट घेतली. तेव्हा ‌’मी नीलेश घायवळ टोळीसाठी काम करत असून, घायवळचा भाऊ सचिन हा क्रीडा शिक्षक आहे. तुम्हाला या वर्षीपण कॅन्टीनचा माल घेण्याच्या नावाखाली आम्हाला पैसे द्यावे लागतील अन्यथा तुमचा व्यवसाय बंद पाडू‌’ अशी धमकी कदमने महिलेला दिली. त्यानंतर महिला मोटारीतून शाळेच्या परिसरातून निघाली होती. त्यावेळी कदमने मोटार अडविली.

त्यावेळी दुसऱ्या मोटारीतून नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि साथीदार उतरले. घायवळचा भाऊ सचिन याने धमकाविले. ‌‘तुम्हाला जिवंत राहायचे नाही का ?‌’, अशी धमकी देऊन लवकर खात्यात पैसे जमा करा, असे सांगितले. त्यानंतर महिलेने घाबरून पुन्हा 22 लाख रुपये बँक खात्यात जमा केले. व्यवसाय बंद होऊ नये म्हणून मी आरोपींना पैसे दिले. याबाबत महिलेने कंपनीतील भागीदारांशी चर्चा केली. चौकशीत कदम याची कोथरूडमध्ये डेअरी नसल्याची माहिती समजली. त्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT