वाहन निर्यातीने घेतला वेग; 4.55 लाख वाहने सातासमुद्रापार  Pudhari
पुणे

Vehicle Exports: वाहन निर्यातीने घेतला वेग; 4.55 लाख वाहने सातासमुद्रापार

युटिलिटी व्हेईकल (यूव्ही) मुळे कारची निर्यात वीस टक्क्यांनी वाढली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दुचाकी आणि सामान्य कारच्या देशांतर्गत विक्रीत एप्रिल महिन्यात घट झाली आहे. मात्र, दुचाकीसह कार आणि तीनचाकी वाहनांची निर्यात यंदा 15.6 टक्क्यांनी वाढून 4.55 लाखांवर गेली आहे. युटिलिटी व्हेईकल (यूव्ही) मुळे कारची निर्यात वीस टक्क्यांनी वाढली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) ही आकडेवारी जाहीर केली. एप्रिल महिन्यात देशांतर्गत वाहनांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत 20 लाख 88 हजार 932 वरून 18 लाख 11 हजार 876 रुपयांवर आली आहे. त्यातही दुचाकींची विक्री 17 लाख 51 हजारांवरून 14 लाख 58 हजारांवर घसरली आहे. एप्रिल महिन्यात वाहनांची निर्यात 3 लाख 93 हजार 758 वरून 4 लाख 55 हजार 330 वर गेली आहे. (Latest Pune News)

कारची निर्यात 49 हजार 563 वरून 59,395 वर गेली आहे. त्यात सामान्य कारची विक्री 30 हजार 268 वरून 27 हजार 947 वर घसरली आहे. जवळपास पावणेआठ टक्क्यांनी सामान्य कारची चमक घटली आहे.

तर, स्पोर्टलूक असणार्‍या युटिलिटी व्हेईकल (यूव्ही) श्रेणीतील कारची मागणी 19 हजार 22 वरून 31 हजार 115 वर झेपावली आहे. वर्षभरात यूव्ही वाहनांच्या निर्यातीत तब्बल 63.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हॅन्सची निर्यात 273 वरून 333 वर गेली आहे.

स्कूटर, मोपेड आणि मोटारसायकल अशी तीनही श्रेणीतील दुचाकींची निर्यात 3 लाख 21 हजार 50 वरून 3 लाख 68 हजार 201 वर गेली आहे. एप्रिल 2024 च्या तुलनेत निर्यातीत 14.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्कूटरची विक्री 18.2 टक्क्यांनी घटून 53,879 वर आली आहे.

गतवर्षी याच कालावधीत 65,874 स्कूटरची विक्री झाली होती. मोटारसायकलची विक्री 2 लाख 54 हजार 744 वरून 3 लाख 13 हजार 8 वर गेली आहे. त्यात तब्बल 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. मोपेडची विक्री 432 वरून 1 हजार 314 वर गेली आहे.

प्रवासी तीनचाकी रिक्षांची निर्यात 22 हजार 359 वरून 27 हजार 278 वर गेली आहे. गतवर्षीपेक्षा यात 22 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली आहे. मालवाहतुकीच्या तीनचाकी वाहनांची विक्री 122 वरून 246 वर गेली आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, नेपाळ, आखाती देश, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको या देशांमध्ये दुचाकींची अधिक निर्यात होते. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), चिली, तुर्कस्तान, कोलंबिया, ब्राझील आणि चिली येथे कारची निर्यात अधिक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT