

खेड : आडगाव (ता. खेड) येथील इयत्ता ११वीची परीक्षा दिलेल्या प्रांजल गोपाळे हिचा संर्पदंशाने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. १६ ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्राजंल जनावरांसाठी वळईमधुन चारा काढत होती. यावेळी तिला अचानक सर्पदंश झाला.
तिला खासगी वाहनाने पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावेळी डॉक्टर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले, असा आरोप प्रांजलच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांच्याकडे विचारणा केली असता पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधित रुग्ण आला नसल्याचा दावा करण्यात आला.
चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैधकिय अधिक्षका डॉ. तेजश्री रानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रुग्णालयात सकाळी १०.३० दरम्यान संर्पदंश झालेल्या प्रांजल हिच्यावर सर्पदंश लस देऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. विषाची मात्रा पाहता अशा पेशंटला आयसीयूची गरज असते. १०८ अँम्बुलन्समधून वायसीएममध्ये रेफर करण्यात आले; मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले.
एकूणच प्राजंल गोपाळे हिला आडगावपासून पश्चिमेला आंबोली १० किलोमीटर अतंरावर तर पुर्वकडील पाईट प्राथमिक आरोग्य केंद्र १५ किलोमीटर अतंरावर असताना ४० किलोमीटर अतंरावरील राजगुरुनगरला आणण्याची नामुष्की ओढवली. तिला वेळेत उपचार न मिळाल्याने आरोग्य यत्रंणेच्या अनास्थेची ती बळी ठरली.