विश्रांतवाडी: कळस गावठाण येथे आज शिवसेना (शिंदे गट) व कळस परिसरातील नागरिकांनी ईव्हीएम मशीनचा गैरवापर होत असून, मशीनमध्ये बिघाड असूनही मतदान प्रक्रिया राबविल्याचा आरोप करीत तीव निषेध आंदोलन केले.
ईव्हीएम मशिनमध्ये बटणांचा बिघाड तसेच व्हीव्हीपॅट (ततझअढ) स्लिपद्वारे मतदान पडताळणी न केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. या वेळी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा दिल्या.
या आंदोलनात कळस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनची बटणे व्यवस्थित कार्यरत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या होत्या. स्लिपचा वापर करून मतदानाची पडताळणी करण्यात आली नाही. प्रभाग एकमधील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात होती.
यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मतदानाची टक्केवारी घटली, असे या वेळी आंदोलकांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया संशयमुक्त व विश्वासार्ह राहावी, यासाठी निवडणूक आयोगाने वरील मुद्द्यांवर लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणीही आंदोलकांनी केली. तसेच, योग्य व समाधानकारक खुलासा न झाल्यास लोकशाही मार्गाने अधिक तीव आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या वेळी माजी नगरसेवक सतीश म्हस्के, गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, विवेक बनसोडे, हेमलता बनसोडे, प्रदीप रावते, जनार्दन वाघमारे, मारुती जाधव, युवराज बनसोडे, नानासाहेब देवकर, आशा परदेशी, वंदना देवकर, कमल देवकर, प्रमिला देवकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.