पुणे: शहरात दररोज 80 हून अधिक नागरिकांना श्वान चावा घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या सव्वातीन वर्षांत तब्बल एक लाखाहून अधिक पुणेकर श्वानदंशाचे बळी पडले असून, गल्लीबोळातून आता चालणेही मुश्किल झाले आहे.
जानेवारी 2022 ते मे 2025 या कालावधीत शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये एक लाखाहून अधिक नागरिकांनी श्वानदंशावर उपचार घेतले. एका माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना महापालिका आणि ससून रुग्णालयाने दिलेल्या उत्तरातून हे वास्तव समोर आले आहे. दरवर्षी शासकीय रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. (Latest Pune News)
2022 मध्ये 21,421, तर 2023 मध्ये 32,322, तसेच 2024 मध्ये 37,524 तर 2025 च्या मे महिन्यापर्यंत 16,253 नागरिकांनी उपचार घेतले आहेत. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये शहरातील भटक्या श्वानांची संख्या तीन लाख 15 हजार होती.
त्यानंतर 2023 मध्ये ती एक लाख 79 हजार इतकी कमी झाली. 2018-19 मध्ये 11 हजार श्वानांची नसबंदी झाली; तर 2022-23 मध्ये 27 हजार श्वानांची नसबंदी झाली, त्यामुळे शहरातील भटक्या श्वानांची संख्या कमी झाली. महापालिकेने भटक्या श्वानांची नसबंदी, रेबिज प्रतिबंधक लसीकरणावर भर दिल्याचा दावा केला आहे.
प्रजनन दरही कमी झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंदे यांनी दिली. काही प्रकरणांमध्ये पीडितांना नुकसानभरपाई द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, अॅनिमल वेलफेअर बोर्डाने याबाबत स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. महापालिकेने 2025 मध्ये श्वानदंशामुळे एक लहान मुलगा गंभीररीत्या जखमी झाल्यावर त्याचा उपचारांचा खर्च दिला. शहरात भटके श्वान दिसत असले तरी त्यांची नसबंदी झालेली असते. अधिकाधिक श्वानांच्या लसीकरणावर भर देणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.