Leopard Attack: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वंश सिंग या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सात दिवासांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात 12 पिंजरे वन विभागाने लावले आहेत. परंतु, त्यात बिबट्या जेरबंद झालेला नाही. या घटनेतील पीडित कुटुंबाला वन विभागाच्या माध्यमातून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, असे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर गेल्या सात दिवसांपासून वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत वन विभागाचे अधिकारी भानुदास शिंदे यांनी सांगितले की, वन विभागाने मांडवगण फराटा परिसरात 12 पिंजरे लावले आहेत. 6 ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. गेले दोन दिवस ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात आहे. बिबट्याला लवकरच जेरबंद केले जाईल.
या घटनेतील पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. पुढील मदतीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. मांडवगण फराटा परिसरातील जुनामळा, पिंपळसुटी, भैरू फराटेवाडी, गायकवाडमळा येथील वस्तीवरील कुर्त्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. या परिसरात बिबट्या शेतकर्यांना सातत्याने दिसत आहे. काही नागरिकांच्या गाडीला देखील बिबट्या रात्रीच्या वेळी आडवा गेला आहे, असे सरपंच समीक्षा फराटे पाटील यांनी सांगितले.