नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासनाकडून भेसळखोरांवर करडी नजर ठेवली जात असून, विक्रेते आणि उत्पादकांची नियमित तपासणी केली जात आहे. गेल्या बुधवारी (दि.२३) प्रशासनाच्या पथकाने सातपूर येथील सागर स्विट येथे अचानक भेट देत तपासणी केली असता, परराज्यातून आलेल्या १५ किलो ग्रॅमच्या डब्यात गायीचे तुप भेसळयुक्त असल्याच्या संशयातून जप्त करण्यात आले आहे. या तुपाची किंमत एक लाख ४८ हजार २५५ रुपये इतकी आहे.
अन्न प्रशासनाकडून शहरभर मोहिम राबविली जात असून, खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. सातपूर येथील सागर स्विट येथे तपासणी केली जात असता, गायीच्या तुपात भेसळ असल्याचा संशय प्रशासनास आला. त्यानंतर तुप जप्त करण्यात आले आहे. तसेच इंदिरानगर येथील सम्राट स्विटची तपासणी केली असता, परवाना न घेताच याठिकाणी मिठाई अन्न पदार्थांचे उत्पादन व विक्री केली जात असल्याचे आढळून आले. परिणामी पेढीची तपासणी करून येथून गाय तुप, काजु रोल, मलाई बर्फी असे तीन अन्नपदार्थांच्या संशयावरून नमुने घेतले आहेत. तसेच उत्पादन कक्षास परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याचे निर्देशही दिले आहेत. अन्न नमुुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषन अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कारवाई केली जाणार आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, जी. एम. गायकवाड, एस. जे. मंडलिक, तोरणे आदींच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मिठाई तसेच दुधापासून बनविलेले पदार्थ खात्री करूनच खरेदी करावे, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने जनतेला करण्यात आले आहे.