महिना संपला तरीही 13 दुकानदारांना धान्यच नाही Pudhari
पुणे

Pune News: महिना संपला तरीही 13 दुकानदारांना धान्यच नाही

कंत्राटदाराच्या गोंधळामुळे रेशनपासून अनेकजण वंचित राहण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Pune: नोव्हेंबर महिना संपत आला तरीही जिल्ह्यातील तब्बल 13 दुकानदारांना अद्यापही धान्य पोहोचलेले नाही. धान्यवाटपाला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत, यामुळे अनेक ग्राहक धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराने केलेल्या गोंधळामुळे दुकानदारापर्यंत धान्य पोहोचले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी सांगितले.

शहरात रेशनवरील गहू व तांदूळ अद्यापही अनेक दुकानांमध्ये पोहोचले नसल्याचा तक्रारी रेशनदुकानदारांनी केल्या होत्या. या संदर्भात धान्य वेळेत न आल्याने वाटप उशिरा होत असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. हीच स्थिती जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील असून गुरुवार (दि. 28) पर्यंत जिल्ह्यातील 13 दुकानांमध्ये धान्य पोहोचले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. शुक्रवार (दि. 28) पर्यंत सर्व दुकानदारांना धान्य पोहोच केले जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यात एकूण एक हजार 857 रेशन दुकाने असून अंत्योदय योजनेत 754 टन गहू तर 907 टन तांदूळ दिला जातो. तर प्राधान्य योजनेत 4 हजार 720 टन गहू व 7 हजार 183 न तांदूळ वाटप केला जातो. त्या-त्या महिन्याचे धान्यवाटप 30 तारखेपर्यंत करावे लागते. मात्र, दुकानांमध्ये धान्य 28 तारखेपर्यंत पोहोचल्यानंतर ते ग्राहकांना दोन दिवसांत वाटप करण्याचे मोठे आव्हान रेशनदुकानदारांपुढे आहे.

त्यामुळे अनेक ग्राहक धान्यापासून वंचित राहू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन धान्यवाटपासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विभागाकडे देण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी स्पष्ट केले. पुढील महिन्यातदेखील धान्यवाटपासंदर्भात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी, असा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT