पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्यावतीने गुरुवारी (दि.3) राज्यस्तरीय परिषद पुणे येथे बोलवण्यात आली होती. या परिषदेला पणन मंत्री अब्दुल सत्तारदेखील उपस्थित होते. यावेळी मंत्री सत्तार यांच्यावर परिषदेमध्ये शेतकऱ्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रश्नांवरील राज्यस्तरीय परिषदेत अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेटला मला जायचे आहे, असे सांगून बाजार समितीचे प्रश्न न ऐकताच अनपेक्षितपणे पलायन केले.
त्यामुळे सकाळपासून थांबलेल्या बाजार समितीच्या पदाधिका-यांनी अब्दुल सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा देत निगडी येथील ग दि माडगूळकर सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. पन्नास खोके एकदम ओके म्हणत, अब्दुल सत्तार हाय हाय अशा जाहीर निषेध केला. सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या सोमवारी लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.