पुणे

आचार्य अत्रे यांचे मुंबईत स्मारक उभारा

अमृता चौगुले

पुणे;  पुढारी वृत्तसेवा : संयुक्त महाराष्ट्र आणि मराठी भाषेकरिता आचार्य अत्रे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कुटिल डावदेखील त्यांनी हाणून पाडला. प्रतिभावंत, बहुआयामी आणि निर्भीड असे अत्रे यांचे विचार, साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहचले पाहिजे. आचार्य अत्रे यांच्या योगदानामुळे मुंबई महाराष्ट्रात आहे. त्याच मुंबईत त्यांचे स्मारक राज्य शासनाने उभारावे, अशी मागणी ज्येष्ठ कलाकार बाबूराव कानडे यांनी रविवारी केली.

ज्येष्ठ नाटककार, लेखक, वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या 125 व्या जन्म वर्षाला रविवारी सुरुवात झाली. यानिमित्ताने संवाद पुणे व कोहिनूर ग्रुपतर्फे कानडे यांना 'प्र. के. अत्रे कोहिनूररत्न' पुरस्कार खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. कृष्णकुमार गोयल, पं. वसंतराव गाडगीळ, सुनील महाजन, निकिता मोघे उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, मला आचार्य अत्रे यांना जवळून पाहण्याचा योग आला होता. मराठी माणसांसाठी अवघे जीवन त्यांनी वाहून दिले होते. त्यांचे कार्य व विचार आपण पुढे नेले पाहिजे. देशमुख म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांचे मोठे योगदान आहे. स्त्रीमुक्तीसाठीदेखील त्यांनी कामे केली. सीमा भाषकांसाठी, मराठीसाठी तसेच मराठी कायदा करण्यासाठी आपण चळवळ उभी केली पाहिजे. बेळगाव, कारवारसह सीमा भागातील सुमारे 750 मराठीभाषिक गावे महाराष्ट्रात आलेली नाहीत. या सर्व गावांतील मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी काम करणे, हीच अत्रे यांना आदरांजली ठरेल. या वेळी आचार्य अत्रे यांच्या साहित्यावर आधारित 'बहुआयामी अत्रे' दृकश्राव्य कार्यक्रम विनिता आपटे व माधुरी वैद्य यांनी सादर केला.

साहित्य परिषदेतर्फे अभिवादन

ज्येष्ठ नाटककार, लेखक, वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या 125 व्या जन्मवर्षाला रविवारी सुरुवात झाली. त्यानिमित्ताने अखिल भारतीय साहित्य परिषद पुणेतर्फे आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, अत्रे यांंच्या पुस्तकांचे पूजन करण्यात आले. कवी बाबा ठाकूर, श्याम भुर्के, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. धनंजय इंचेकर, सचिन साठे उपस्थित होते. अत्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. पुण्याच्या उभारणीतही त्यांचे खूप मोठे योगदान आहे, असे भुर्के यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT