निव्वळ लागवडीखालील क्षेत्र येणार रेकॉर्डवर  File Photo
पुणे

E-Pik survey: निव्वळ लागवडीखालील क्षेत्र येणार रेकॉर्डवर

सध्या लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पडक्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी, सध्या लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे.

भूमिअभिलेख विभागाने याबाबत जानेवारीतच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे क्षेत्र नोंदविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याबाबत उदासीनता दिसून आली. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र ई-पीक पाहणीतून नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.  (Latest Pune News)

राज्यात 2013 च्या कृषी गणनेनुसार राज्यात सरासरी 1 कोटी 69 लाख हेक्टरवर लागवड केली जाते. मात्र, ही आकडेवारी निश्चित नाही. यात कायम पड असलेल्या क्षेत्राचाही समावेश आहे. या कायम पडक्षेत्राची नोंद काही शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर केली आहे. मात्र, काहींनी ती केलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राची आकडेवारी कमी आहे. राज्यात सुमारे 4 कोटी स्वमालकीचे क्षेत्र आहे, तर सुमारे 3 कोटी शेते आहेत.

राज्यामध्ये 11 कोटी लोकसंख्येपैकी महसूल विभागातील अधिकार अभिलेखात सातबारा उतारा नावावर असलेल्यांची संख्या 1 कोटी 71 लाख आहे. मात्र, यातील सर्वच जण शेती करतात असे नाही. शहरांलगतच्या अनेक गावांमध्ये तुकड्यांमध्ये शेती नावावर आहे. प्रत्यक्षात हे क्षेत्र बिगरशेती नसल्याने ते अजूनही शेती म्हणूनच अधिकार अभिलेखात नोंदले गेले आहे.

त्यामुळेच भूमिअभिलेख विभागाने हे कायम पड किंवा अकृषक क्षेत्र रेकॉर्डवर आणण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जानेवारीतच अशा क्षेत्राची पाहणी करून ते सातबारा उताऱ्यावर नोंदवावे.

त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली आहे. अशा क्षेत्राचा फोटो काढून त्याची नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्देशांना जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. त्यामुळेच आता या कायम पडक्षेत्राची नोंद ई-पीक पाहणीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत केवळ 77 हजार 441 हेक्टर क्षेत्राची नोंद या ई-पीक पाहणीत शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरीकरण आणि नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन पाच गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवाशांसाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्यापही शेतीक्षेत्रातच केली जात आहे. प्रत्यक्षात इतक्या कमी क्षेत्रावर कुठेही लागवड केली जात नाही. त्यामुळे असे क्षेत्र नावावर असलेले जमीनमालक ई-पीक पाहणी करीत नाहीत.

भूमिअभिलेख विभागाने या क्षेत्राची जिल्हानिहाय यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहे. या यादीची प्रत्यक्ष पडताळणी करून लागवडीखालील स्वमालकीच्या क्षेत्रातून हे क्षेत्र वगळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मूळ लागवडी खालील क्षेत्रातून हे क्षेत्र वजावट केल्यास राज्यातील लागवडीखालील क्षेत्राची आकडेवारी अचूक मिळण्यास मदत होणार आहे.

कायम पडक्षेत्राची नोंद झाल्यास त्याचे एकत्रित रेकॉर्ड राज्य सरकारकडे उपलब्ध होईल. त्यातून निव्वळ लागवडीखालील क्षेत्राची खरी आकडेवारी समोर येईल.
- सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान कक्ष, भूमिअभिलेख विभाग, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT